दररोज 40 किमी रस्ते उभारण्याचे लक्ष्य : गडकरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

देशातील रस्ते सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून दररोज 40 किलोमीटरचे रस्ते उभाण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नवी दिल्ली - देशातील रस्ते सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून दररोज 40 किलोमीटरचे रस्ते उभाण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

एका राष्ट्रीय परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले, "मागील आर्थिक वर्षात 8 हजार 144 किलोमीटरचे रस्ते उभारण्यात आले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दररोज केवळ दोन किलोमीटरचे रस्ते उभारण्यात आले आहेत. आमच्या सरकारने 21 मार्च 2017 रोजीपर्यंत दररोज सरासरी 23 किलोमीटरचे रस्ते उभारले आहेत. पुढील वर्षाचे आमचे उद्दिष्ट दररोज 40 किलोमीटरचे रस्ते उभारण्याचे आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही हे उद्दिष्ट गाठू.'

देशातील राष्ट्रीय महामार्गांमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे सांगत गडकरी म्हणाले, "राष्ट्रीय महामार्गांची लांबी वाढविण्यात येत आहे. सध्या 96 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग 2 लाख किलोमीटरपर्यंत नेण्यात येणार आहेत.' रस्ते उभारणी संदर्भातील निर्णयप्रक्रिया वेगाने होत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.