आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा निर्णय विचारपूर्वक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 मे 2017

सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या आईशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मागील अनेक दिवसांपासून स्वराज या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय भारताने विचारपूर्वक घेतला असून, तो सुनियोजित प्रयत्नांचा एक भाग आहे.

भारताने घेतलेल्या या भूमिकेला प्राथमिक न्याय मिळाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तत्पूर्वी हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे. 

बागले म्हणाले, ''पाकिस्तानने 1971 मध्ये भारताच्या विरोधात या न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीतून जाण्यास परवानगी न देण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात ही दाद मागण्यात आली होती. भारतानेही त्या वेळी न्यायालयाच्या अधिकारकक्षेत ही बाब येत नसल्याची भूमिका घेतलेली होती.'' 

ताज्या घटनाक्रमाबाबत ते म्हणाले, ''कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना पकडून त्यांच्यावर परस्पर खटला चालविण्याचा प्रकार व त्यांना भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटू न देणे किंवा भारताला त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्कच उपलब्ध होऊ न देण्याचा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय व मुख्यतः व्हिएन्ना संकेतांचा भंग असल्याची भूमिका भारताने घेतली.

भारताने 8 मे रोजी या न्यायालयाकडे अर्ज केला होता. मंगळवारी त्यावर सुनावणी होऊन जाधव यांची फाशी रोखण्यात आली. जाधव यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी मिळावी यासाठी भारताकडून केल्या गेलेल्या सोळा अर्जांच्या प्रती न्यायालयास सादर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे जाधव यांच्या आई व अन्य कुटुंबीयांनी पाकिस्तान सरकारकडे व्हिसा मागण्यासाठी केलेले अर्ज, आईचे फाशी न देण्याबाबतचे आवाहन, सुषमा स्वराज यांनी जाधव यांच्या आईला व्हिसा द्यावा यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताझ अझीझ यांना लिहिलेले पत्र, हे सर्व दस्तावेज भारताने सादर केले होते.'' 

भारताचे प्रयत्न, पाकचा कांगावा 

  • सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या आईशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मागील अनेक दिवसांपासून स्वराज या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 
  • जाधव यांची सर्व माहिती पाकने गोपनीय ठेवली आहे, सध्या ते कोठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत पाकडून कोणतीही माहिती दिली गेली नसल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत. 
  • भारताने कुलभूषण प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर पाकिस्तानकडून याचाच कित्ता गिरवला जाऊ शकतो, अशी शक्‍यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
  • दहशतवादाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भारताकडून कुलभूषण प्रकरणाचा वापर केला जात असल्याचा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांचा कांगावा. 
  • पाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील भारताच्या याचिकेचा अभ्यास करत असून, पुढील काही दिवसांत यावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले जाईल, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
Web Title: India deliberately took decision to approach ICJ for Kulbhushan Jadhav