सशाबरोबरच वाघाशी सामन्याचीही तयारी: पर्रीकर

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

""कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्यास भारत सुसज्ज आहे. जर तुम्ही जंगलात सशाची शिकार करण्यासाठी गेला आहात; तर त्याच वेळी वाघाचा सामना करण्याची तयारीही ठेवा, असे माझी आई मला सांगत असे,‘‘ -  मनोहर​ पर्रीकर 

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यास उत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून केलेल्या प्रखर कारवाईनंतर भारत व पाकिस्तानमधील वाढलेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत कोणत्याही प्रकारच्या आव्हानास तोंड देण्यासाठी सुसज्ज असल्याचे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले आहे. 
 

याचबरोबर, संरक्षण मंत्र्यांनी यावेळी चीनची यासंदर्भातील भूमिका हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय असल्याचे प्रतिपादनही केले. भारताबरोबर संघर्ष झाल्यास चीन पाकिस्तानला पाठिंबा देईल, असा दावा पाकिस्तानमधील काही माध्यमंनी केला होता. परंतु चीनने असे काही आश्‍वासन देण्यात आल्याचा दावा फेटाळून लावला आहे. चीनची ही भूमिका म्हणजे भारताचा राजनैतिक विजय असल्याचे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले. 

पाकिस्तानमधील वातावरण अत्यंत तणावग्रस्त झाले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पर्रीकर यांनी व्यक्त केलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.