भारताला एक दुबळा पंतप्रधान मिळाला आहे: राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

अमेरिकेकडून जम्मु काश्‍मीर राज्याचा उल्लेख "भारतीय प्रशासित काश्‍मीर' केल्यावरही आक्षेप न घेतल्यामुळे गांधी यांच्याकडून मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे...

नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत भारतला एक दुबळा पंतप्रधान मिळाला असल्याची टीका केली आहे.

अमेरिकेकडून जम्मु काश्‍मीर राज्याचा उल्लेख "भारतीय प्रशासित काश्‍मीर' केल्यावरही आक्षेप न घेतल्यामुळे गांधी यांच्याकडून मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. याचबरोबर, मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात "एच 1 बी व्हिसा'संदर्भातील संवेदनशील मुद्याचा उल्लेखही टाळल्याने गांधी यांच्याकडून पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आले आहे.

हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या सईद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भात अमेरिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये जमु काश्‍मीर राज्याचा उल्लेख भारतीय प्रशासित काश्‍मीर असा करण्यात आला होता. केंद्र सरकारने या निवेदनामधून सलाहुद्दीन हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याची भूमिका घेतली आहे. याचबरोबर, याआधीच्या कॉंग्रेस शासित काळामध्येही अमेरिकेकडून काश्‍मीरचा उल्लेख असाच करण्यात आला असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.