मेजर गोगोई यांना पुरस्कार का दिला?; मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

एखाद्याला मानवी ढाल म्हणून वापरणे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असे फारूखने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 'मेजर गोगोई यांची कृती 'बेकायदा' आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचेही उल्लंघन करणारी आहे'

श्रीनगर : दगडफेक करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय लष्करातील मेजर लितूल गोगोई यांनी ज्या युवकाला जीपच्या समोर बांधून त्याची वरात काढली, त्याने आता मेजर गोगोई यांना मिळालेल्या पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे. काश्‍मीर खोऱ्यातील तणावग्रस्त परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मेजर गोगोई यांना लष्करप्रमुखांतर्फे गेल्या सोमवारी पुरस्कार जाहीर झाला होता. 

गेल्या 9 एप्रिल रोजी बडगाममधील एका मतदान केंद्राला अंदाजे 1200 जणांच्या जमावाने घेरले होते. दगडफेक करणाऱ्या या जमावाने नंतर पेट्रोल बॉम्ब टाकत मतदान केंद्राला आग लावण्याचाही प्रयत्न केला होता. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मेजर गोगोई यांनी त्या जमावात असलेल्या 26 वर्षीय फारूख अहमद दार याला पकडून जीपला बांधले. यानंतर जमावाची दगडफेक थांबली आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांसह मेजर गोगोई सुरक्षित त्या ठिकाणाहून निघून गेले. या घटनेचा वृत्तांत खुद्द मेजर गोगोई यांनी काल (मंगळवार) सांगितला. 

आता या पार्श्‍वभूमीवर फारूख अहमद दारने राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली आहे. 'मेजर गोगोई यांना या कृत्याबद्दल पुरस्कार का देण्यात आला' असा प्रश्‍न त्याने विचारला आहे. तसेच, 'इंडिया टुडे', 'टाईम्स नाऊ' आणि 'रिपब्लिक टीव्ही' या तीन वृत्तवाहिन्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही त्याने केली. या वृत्तवाहिन्यांनी फारूखचा उल्लेख 'दगडफेक करणारा' असा केला होता. त्यावर फारूखने आक्षेप घेतला आहे. 

एखाद्याला मानवी ढाल म्हणून वापरणे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असे फारूखने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 'मेजर गोगोई यांची कृती 'बेकायदा' आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचेही उल्लंघन करणारी आहे', असे त्यात नमूद केले आहे.

काश्‍मिरी युवकाला जीपला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा गौरव

काश्मीरमध्ये युवकाला लष्कराच्या जीपला बांधले