300 कोटींचा गैरव्यवहार; केजरीवाल यांच्यावर कपिल मिश्रांचा आरोप

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

टाटांनी सरकारला आठ लाखांत रुग्णवाहिका देण्याची तयारी दाखविली होती; मात्र सरकारने त्यासाठी 23 लाख रुपये खर्च केले. सरकारच्या मते महागड्या रुग्णवाहिका या आगविरोधी आहेत; मात्र त्यातील दोन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

नवी दिल्ली : पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या कपिल मिश्रा यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली आरोग्य विभागातर्फे औषधखरेदीमध्ये 300 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. 

येथे एका पत्रकार परिषदेत मिश्रा म्हणाले की, राज्य सरकारचा आरोग्य विभागामार्फत 300 कोटी रुपयांचा औषधखरेदीचा गैरव्यवहार झाला आहे. ही औषधे आधीच खरेदी करण्यात आली होती आणि ती रुग्णालयाच्या फार्मासिस्टने तयार केली नव्हती. त्याचप्रमाणे  बदल्यात गैरव्यवहार, मंत्रालयातील नियुक्‍त्या आणि रुग्णवाहिका खरेदीत अनियमितता केल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात आपण लवकर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, येत्या एक दोन दिवसांत आपण मोहल्ला क्‍लिनिकमधील चुकाही सर्वांसमोर आणणार आहोत. मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना केवळ मंत्रिमंडळातून काढले नाही; तर 'आप'मधूनही निलंबित करण्यात आले.

मिश्रा म्हणाले की, सरकारी रुग्णालयांना औषधांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र यात सरकारची काही चुकी नाही कारण त्यांनी औषधखरेदी केली असली तरी ती रुग्णालयांपर्यंत पोचलीच नाहीत. ही औषधे गोडाऊनमध्ये पडून असून, त्यांची मुदत संपत आली आहे. आधीच मोठ्या प्रमाणातील हा साठा कालबाह्य झाला आहे. 

रुग्णवाहिका खरेदीच्या गैरव्यवहाराबद्दल मिश्रा म्हणाले की, टाटांनी सरकारला आठ लाखांत रुग्णवाहिका देण्याची तयारी दाखविली होती; मात्र सरकारने त्यासाठी 23 लाख रुपये खर्च केले. सरकारच्या मते महागड्या रुग्णवाहिका या आगविरोधी आहेत; मात्र त्यातील दोन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.