देशातील जनता भीतीच्या छायेखाली : राहुल गांधी 

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

केंद्र सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करीत असून, अल्पसंख्याकांवर दडपशाही सुरू असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. दलितांवर जुलूम होत आहे. ही स्थिती केवळ सहारनपूरमध्येच नाही तर देशभरात आहे

सहारनपूर : उत्तर प्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आले असून, देशातील जनताही भीतीच्या छायेखाली वावरत आहे. अशा प्रकारे देशाचा कारभार करणे चुकीचे आहे, असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले. 

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यात उसळलेल्या जातीय दंगलीतील पीडितांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी सहारनपूरच्या सीमेवर पोचले. मात्र, प्रशासनाने त्यांना हिंसाग्रस्त भागात जाण्यापासून रोखले. त्यामुळे येथील स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला. 

राहुल यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राज बब्बर, पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद होते. ''प्रशासनाने विनंती केल्यामुळे मी परत जात आहे; पण जेव्हा येथील वातावरण निवळेल तेव्हा मला दंगलग्रस्त भागात घेऊन जाऊ, असे प्रशासनाने म्हटले असल्याचे राहुल गांधी यांनी सीमेवर पोचल्यावर सांगितले. ''केंद्र सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करीत असून, अल्पसंख्याकांवर दडपशाही सुरू असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. दलितांवर जुलूम होत आहे. ही स्थिती केवळ सहारनपूरमध्येच नाही तर देशभरात आहे,'' असे सांगताना ते म्हणाले,'' रोहित वेमुला दडपशाहीचा बळी ठरला. देशातील कोट्यवधी जनता दररोज त्याचा अनुभव घेत आहे.'' 

''सरकार केवळ सुटाबुटातील लोकांचे ऐकून घेते; पण गरिबांचे नाही,'' अशी टीकाही त्यांनी केली. काश्‍मीरबद्दल बोलताना ते म्हणाले की, जम्मू आणि काश्‍मीरमध्ये जेव्हा शांतता असते तेव्हा देशाला फायदा होतो आणि हिंसा होते तेव्हा पाकिस्तानला फायदा होतो. मोदींनी पाकिस्तानचे काम आणखी सोपे केले आहे.