भारतात दरवर्षी कर्करोगाचे आठ लाख नवे रुग्ण

पीटीआय
शनिवार, 3 जून 2017

विजयवाडा : भारतात कर्करोगाचा प्रसार वेगाने होत असून, दरवर्षी कर्करोगाचे आठ लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत; तर कर्करोगामुळे दरवर्षी साडेपाच लाख रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. 

विजयवाडा : भारतात कर्करोगाचा प्रसार वेगाने होत असून, दरवर्षी कर्करोगाचे आठ लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत; तर कर्करोगामुळे दरवर्षी साडेपाच लाख रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. 

वाढते शहरीकरण, औद्योगीकरण आणि जगण्याच्या बदलत्या सवयींमुळे भारतातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सध्या वेगाने वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी येथील 'एनआरआय' विज्ञान अकादमीतर्फे आजच्या राष्ट्रीय कर्करोग मुक्तीदिनी कर्करोगापासून मुक्ती मिळालेल्या रुग्णांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी भारतातील कर्करोगाच्या सद्यस्थितीबद्दल मत व्यक्त केले. 

'एनआरआय' रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अप्पा राव म्हणाले की, सुमारे तीस लाख भारतीयांना कर्करोगाचा त्रास सहन करावा लागतो आहे. एकट्या कर्करोगामुळे भारतात दरवर्षी साडेपाच लाख रुग्णांचा मृत्यू होत असून, दरवर्षी आठ लाख रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान होत आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे. भारतात मुख्यत्वे कर्करोगाचे निदान हे अखेरच्या टप्प्यात होते, त्यामुळे रुग्ण वाचण्याचे प्रमाण कमी आहे. 

डॉ. राव पुढे म्हणाले की, पुढारलेल्या देशांत स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. मात्र, भारतात हेच प्रमाण फक्त 60 टक्के आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या रुग्णांची वाचण्याची शक्‍यता जागतिक पातळीवर 50 टक्के असली तरी भारतात ती 46 टक्के आहे. भारतातील कर्करोग झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होणे आणि आवश्‍यक ते उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्करोगातून वाचऱ्यांचे प्रमाण वाढू शकेल.