गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करा : राजस्थान उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजस्थानच्या उच्च न्यायालयाने गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करावे आणि गोहत्या करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे.

जयपूर (राजस्थान) : एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजस्थानच्या उच्च न्यायालयाने गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करावे आणि गोहत्या करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे.

राजस्थानमधील जयपूर येथील हिंगोणिया सरकारी गोशाळेच्या बहुचर्चित सात वर्षे जुन्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना केली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने न्यायाधीश महेश चंद शर्मा यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. विशेष म्हणजे शर्मा आज (बुधवार) सेवानिवृत्त होत आहेत. केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करावे, यासाठी केंद्र सरकारकडे बाजू मांडण्यासाठी मुख्य सचिव आणि राज्याच्या महाधिवक्ता यांनी कारवाई करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली. हिंगोणिया गोशाळेतील भ्रष्टाचाराची भ्रष्टाचारविरोधी पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.