पाकच्या फुत्काराला भारताचे सडेतोड उत्तर

पाकच्या फुत्काराला भारताचे सडेतोड उत्तर
पाकच्या फुत्काराला भारताचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या नागरिकांच्या लढ्याला जगाने पाठिंबा द्यावा, या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या फुत्काराला भारताने जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाणे, अशी बोचरी टीका भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. राजनाथसिंह यांना पाकिस्तानात अपमानास्पद वागणूक दिल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांचाही दौरा अनिश्‍चित आहे, तर पाकविरोधात अमेरिकेने मोदींना समर्थन द्यावे, अशी मागणी बलुच नेत्यांनी अमेरिकेकडे केली आहे. दरम्यान, खोऱ्यातील हिंसाचारात आज चार जण ठार झाले. 

पाकविरोधात अमेरिकेने मोदींना समर्थन द्यावे

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्‍वासक शब्दांचे बळ मिळालेल्या पाकिस्तानमधील बलुच राष्ट्रवादी चळवळीतील नेत्यांनी पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीविरोधात मोदींना समर्थन देत मदत करण्याचे आवाहन अमेरिका आणि युरोपकडेही केले आहे. 

""धार्मिक दहशतवादाचा धोरण म्हणून वापर करणाऱ्या पाकिस्तानच्या कृतीचे भविष्यात अनिष्ट परिणाम होणार असल्याचे जगाने समजून घ्यावे. दहशतवादाला पाठबळ नव्हे, तर त्याला परिणामकारक विरोध झाला पाहिजे,‘‘ असे बलुच राष्ट्रवादी चळवळीचे अध्यक्ष खलील बलुच यांनी आज येथे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. बलुचिस्तानचा ताबा घेतल्यापासूनच्या जवळपास 70 वर्षांमध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये युद्धगुन्हे केले असून, मानवतेला काळिमा फासला असल्याचा दावा बलुच यांनी केला. आपले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलुचिस्तानने पाकिस्तानविरोधात पाच वेळा युद्ध केल्याचा दाखलाही त्यांनी या वेळी दिला. त्यामुळे अमेरिका आणि युरोपने मोदींचे समर्थन करत पाकिस्तानला दडपशाहीबद्दल जबाबदार धरावे, असे आवाहन खलील बलुच यांनी केले आहे. 

पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये वंशच्छेद करत हजारो सामान्य नागरिकांची हत्या केल्याचा बलुच नेत्यांचा आरोप आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला शासन करण्याऐवजी काणाडोळा केल्याबद्दल बलुच यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान हा सकारात्मक बदल असल्याचे सांगत बलुच यांनी मोदी यांचे आभार मानले. काश्‍मिरी जनतेवर अत्याचार होत असल्याचा आरोप करणाऱ्या पाकिस्तानची खरडपट्टी काढत मोदींनी बलुचिस्तानमधील जनतेवर होत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केला होता. 

बलुच नेत्यांचे म्हणणे 

- काश्‍मिरी जनतेसाठी स्वयंनिर्णयाचा हक्क पाकिस्तान बलुचिस्तानचा हा हक्क डावलत आहे 

- बांगलादेश निर्मितीवेळी केली, त्याप्रमाणे भारताने बलुचिस्तानला मदत करावी 

- भारत सरकार ठोस पाठिंबा देईल, असा विश्‍वास 

- पाकिस्तानच काश्‍मीरमध्ये दहशतवाद पसरवित आहे

पाकिस्तान हा दुसरा नरक - मनोहर पर्रीकर

रेवाडी (हरियाना) - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली असून पाकिस्तानमध्ये जाणे हे नरकात जाण्यासारखे असल्याचे विधान त्यांनी आज येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे दुष्परिणाम पाकला भोगावे लागत असून, भारताशी समोरासमोर लढण्याची हिंमत नसल्याने दहशतवादी सीमावर्ती भागातून घुसखोरी करून हल्ले करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पर्रीकर म्हणाले, की पाकिस्तानकडून वारंवार भारताविरोधात दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, पाकिस्तानमध्ये दबा धरून बसलेले दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. याआधी 1947, 1965, 1971 आणि नंतर कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला आहे. युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने घुसखोरीचा अवलंब केला; पण आम्ही घुसखोरांची दहशतदेखील मोडून काढू. पूर्वी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर आपले सैनिक आदेशाची वाट पाहत बसत. पण आता परिस्थिती बदलली असून शत्रूच्या एका गोळीचं उत्तर दहा गोळ्या झाडून द्या, असे आदेशच आम्ही दिले आहेत असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com