'इंडिया पोस्ट पेमेंट बँके'चे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन 

India Post Payment Bank inaugurated by PM Narendra Modi
India Post Payment Bank inaugurated by PM Narendra Modi

नवी दिल्ली (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय टपाल सेवेच्या "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंके'चे (आयपीपीबी) उद्‌घाटन केले. टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून नागरिकांना घरपोच बॅंकिंग सेवा यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. "आयपीपीबी'तर्फे काही सुविधा वगळता इतर बॅंकांप्रमाणेच सेवा दिली जाणार आहे. 

या टपाल बॅंकेत नागरिकांकडून पैसे स्वीकारले जातील, मात्र कर्ज अथवा क्रेडिट कार्ड दिले जाणार नाहीत. या बॅंकेत एक लाख रुपयांपर्यंत ठेव स्वीकारली जाणार असून, परतावा, मोबाईल पेमेंट, पैसे ट्रान्स्फर, एटीएम, नेट बॅंकिंग, थर्ड पार्टी फंड ट्रान्स्फर अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. कोणत्याही खात्यातील रक्कम एक लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास जास्तीची रक्कम आपोआपच टपाल सेवेच्या बचत खात्यात रूपांतरित केली जाणार आहे. या बॅंकेत सरकारचा शंभर टक्के हिस्सा असून, रिझर्व्ह बॅंकेचे यावर नियंत्रण असेल. 

या टपाल बॅंकेत खाते उघडण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. पोस्टमन अथवा ग्रामसेवकांना स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक यंत्रे देऊन त्याद्वारे नागरिक आपली ओळख पटवून व्यवहार करू शकणार आहेत. बचत खात्यावर चार टक्के व्याज टपाल खात्याने देऊ केले आहे. डिसेंबरपर्यंत देशातील 1.55 लाख टपाल कार्यालयांचा वापर बॅंकेसाठी केला जाणार आहे. सध्याच्या बॅंकांच्या एकूण जाळ्याच्या अडीच पट मोठे हे जाळे असेल. ग्रामीण आणि शहरी भागात पोस्टमनद्वारे बॅंकिंग सुविधा वापरता येणार आहे. 
 
"आयपीपीबी'साठीच्या दिमतीला... 
3 लाख : पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक 
650 : शाखा 
3250 : केंद्र 
1435 कोटी रुपये : बॅंकेच्या उभारणीसाठीचा निधी 

"आयपीपीबी'मुळे देशात सामाजिक आणि आर्थिक बदल घडून येऊ शकतो. या सुविधेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या दारात बॅंकेची सेवा उपलब्ध होणार आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com