भारताकडून सिंधु पाणीवाटप कराराचे 'परीक्षण'

वृत्तसंस्था
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे लष्करशहा आयुब खान यांच्यामध्ये 1960 मध्ये झालेल्या या करारानुसार सिंधु, बियास, रावी, सतलज, चिनाब आणि झेलम या सहा नद्यांचे 80% पाणी पाकिस्तानला देण्याचे मान्य करण्यात आले होते.

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) दोन देशांमधील वादग्रस्त सिंधु पाणी वाटप कराराचे पुन: परीक्षण करण्यात आले. 

पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि परराष्ट्र सचिव एस जयशंकर हेदेखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपस्थित होते. पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पाणीवाटपाचा हा करार भारताने धुडकावून लावावा, असे मत विविध स्तरावर व्यक्त करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर झालेली ही बैठक अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. 
 

जागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने झालेल्या करारामधून कायमच पाकिस्तानला प्रचंड झुकते माप देण्यात आल्याची टीका करण्यात आली असून या कराराचे परीक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.