पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये अशी झाली कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार मारल्याची घोषणा भारताने केल्यानंतर या कारवाईवर अचानक प्रकाशझोत पडला आणि पाकिस्तानने थयथयाट सुरू केला.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार मारल्याची घोषणा भारताने केल्यानंतर या कारवाईवर अचानक प्रकाशझोत पडला आणि पाकिस्तानने थयथयाट सुरू केला.

पार्श्‍वभूमी
उरीतील दहशतवादी हल्ल्यात आपले 18 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरवात केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्‍मीरचे तुणतुणे वाजवले होते. एनाम गंभीर या भारतीय अधिकाऱ्याने शरीफ यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही आमसभेत हिंदीत भाषण करत पाकिस्तानच्या दाव्यांच्या चिंधड्या उडविल्या होत्या. त्याच्या आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर सभेत पाकिस्तानच्या जनतेशीच संवाद साधत तेथील राज्यकर्ते आणि लष्कराच्या कारवायांवर बोट ठेवले होते.

कारवाई काय झाली?
पाकव्याप्त काश्‍मीरमधील प्रशिक्षण तळांवर दहशतवादी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर किमान 20 वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले होते. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्कराने उधळले होते. आता पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल (बुधवार) मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 या कालावधीमध्ये भारतीय लष्कराचे काही जवान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. प्रत्यक्ष ताबारेषेपासून 500 मीटर ते दोन किलोमीटर एवढ्या अंतरामध्ये ही कारवाई झाली. प्रत्यक्ष कारवाई ही जमिनीवर झाली. या कारवाईमध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमधील किमान पाच दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईमध्ये भारताचा कोणताही जवान जखमी झालेला नाही; तर 'आमचे दोन सैनिक ठार आणि नऊ सैनिक जखमी झाले,' असा दावा पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया
अपेक्षेनुसार, पाकिस्तानने सुरवातीला संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि नंतर या 'सर्जिकल स्ट्राईक'ला 'भारताने केलेले आक्रमण' असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. भारताने कारवाईची अधिकृत घोषणा केल्यामुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानने आता भारतालाच 'आक्रमक' ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. 'भारताने पुन्हा अशी कारवाई केल्यास पाकिस्तान पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देईल,' असा इशाराही पाकिस्तानने दिला आहे.

पुढे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या योजना कार्यान्वित केल्या असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये पाहण्यास मिळत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) दुपारी चार वाजता सर्वपक्षीय बैठकही बोलाविली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सिंधू पाणी वाटप कराराचाही पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर याविषयीही काही निर्णय होण्याची शक्‍यता आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनाही देण्यात आली आहे.

देश

नवी दिल्ली: काश्‍मीरमध्ये शांतता व आनंद निर्माण होण्यास ईदची मदत होईल, अशी आशा व्यक्त करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी...

05.03 AM

लखनौ: योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज 100 दिवस पूर्ण झाले. सरकार या सत्ता काळातील कामगिरी सर्वोत्कृष्ट...

04.03 AM

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद बुधवारी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री...

03.03 AM