... आणि पाकिस्तानी हेराची भारत करतोय देखभाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

एकीकडे हेरगिरीच्या संशयावरुन पाकिस्तानकडून भारतीय नागरिकास थेट फाशी दिली जात आहे; तर दुसरीकडे साजीद मुनीर या पाकिस्तानी हेरास पाकिस्तानने स्वीकारावयासही नकार दिल्यानंतर त्याचा भोपाळ पोलिसदलाकडून सांभाळ केला जात आहे

भोपाळ - कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास हेरगिरीच्या संशयावरुन फाशी देण्यासंदर्भात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घोषणेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर, भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी हेराचा भोपाळ येथील पोलिस दलाकडून केला जाणारा सांभाळ अधिक प्रकर्षाने उठून दिसणारा आहे.

एकीकडे हेरगिरीच्या संशयावरुन पाकिस्तानकडून भारतीय नागरिकास थेट फाशी दिली जात आहे; तर दुसरीकडे साजीद मुनीर या पाकिस्तानी हेरास पाकिस्तानने स्वीकारावयासही नकार दिल्यानंतर त्याचा भोपाळ पोलिसदलाकडून सांभाळ केला जात आहे.

भारतीय लष्कराच्या भोपाळमधील तळावर आयएसआय या पाकच्या कुप्रसिद्ध गुप्तचर संस्थेसाठी "नजर' ठेवल्याप्रकरणी मुनीर याला 12 वर्षांचा कारावास झाला होता. हेरगिरीच्या आरोपांतर्गत दोषी आढळल्यानंतर मुनीर याला 12 वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनाविण्यात आली होती. शिक्षा भोगलेल्या मुनीर याला स्वीकारावयास पाकिस्तानकडून स्पष्ट नकार देण्यात आला. यामुळे येथील पोलिस दलाकडूनच गेल्या 10 महिन्यांपासून त्याची काळजी घेतली जात आहे.

भोपाळमधील कोह-इ-फिझा या पोलिस ठाण्यामध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. येथील जिल्हा विशेष विभागाकडून मुनीर याच्या देखभालीचा पूर्ण खर्च करण्यात येत आहे. मुनीर याला पाकिस्तानकडे हस्तांतरित करण्यात यावे, अशा आशयाची विनंती भोपाळ पोलिस दलाकडून पोलिस मुख्यालयाकडे करण्यात आली आहे. मात्र अद्यापी याप्रकरणी पाकिस्तानकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. परंतु तोपर्यंत मुनीर याची भारताकडून काळजी घेण्यात येत आहे.

जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याची भूमिका भारताने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना समन्स बजाविण्यात आले आहे. भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि न्यायाच्या मुलभूत नियमांना डावलून पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनाविली आहे. 

Web Title: India takes care of a Pakistani spy