कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न : व्ही. के. सिंह

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

व्हिएन्ना करारानुसार एखादा देश जेव्हा अन्य देशांच्या नागरिकास अटक करतो तेव्हा त्या नागरिकास आपली बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करून देणे अनिवार्य असते.

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कुलभूषण यांना चांगला वकील मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असताना पाकने मात्र तेरा वेळेस आमची ही मागणी धुडकावून लावल्याचे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले.

पाकिस्तानने जाधव यांना इराणमधून ताब्यात घेतल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला. व्हिएन्ना करारानुसार एखादा देश जेव्हा अन्य देशांच्या नागरिकास अटक करतो तेव्हा त्या नागरिकास आपली बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करून देणे अनिवार्य असते.

भारताने कुलभूषण यांच्या शिक्षेला आव्हान दिले असून, पाककडे त्यांच्याविरोधातील आरोपपत्राची मागणीही केली आहे.

काश्‍मिरी आंदोलकांकडून सीआरपीफच्या जवानांना झालेल्या मारहाणीबाबत प्रश्‍न विचारला असता सिंह म्हणाले की, ''सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ मी पाहिलेला नसून त्यावर प्रतिक्रियाही दिलेली नाही. यासाठी सत्य जाणून घेतले जाईल.''