चीनविरोधात स्वतःचे संरक्षण करण्यास भारत पूर्णत: सक्षम - सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

ट्रायजंक्‍शनच्या मर्यादेचे उल्लंघन करण्याच्या उद्देशार्थ चिनी सैन्य बुलडोझर व बांधकामाची यंत्रे घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. हा भारताच्या सुरक्षेला थेट धोका आहे. भारताला कोणतेही भय वाटत नसून भारत चीनविरोधात स्वत:चे संरक्षण करण्यास पूर्णत: सक्षम आहे

नवी दिल्ली - डोकलाम येथे भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (गुरुवार) "भारत स्वत:च्या हिताचे संरक्षण करण्यास सक्षम' असल्याचे राज्यसभेत सांगितले. चीनकडून भारताला सतत इशारे देत येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांनी आज भारतीय भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

संसदेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये चीनबरोबरील तणावाचे मोठे पडसाद उमटले आहेत. समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव यांनीही काल सभागृहात बोलताना चीनसंदर्भातील भारतीय धोरण बदलण्याची मागणी केली होती.

"भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनच्या मर्यादेच्या अधिकाधिक जवळ येण्याचे प्रयत्न चीनकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहेत. यासाठी येथे रस्तेबांधणीसह अन्य गोष्टीही चीनकडून करण्यात आल्या आहेत. यावेळी मात्र ट्रायजंक्‍शनच्या मर्यादेचे उल्लंघन करण्याच्या उद्देशार्थ चिनी सैन्य बुलडोझर व बांधकामाची यंत्रे घेऊनच घटनास्थळी दाखल झाले. हा भारताच्या सुरक्षेला थेट धोका आहे. भारताला कोणतेही भय वाटत नसून भारत चीनविरोधात स्वत:चे संरक्षण करण्यास पूर्णत: सक्षम आहे,'' असे स्वराज यांनी सांगितले.

या ट्रायजंक्‍शनपासून भारतीय लष्कर मागे घेण्याच्या चीनच्या मागणीसंदर्भात बोलताना स्वराज यांनी चीननेही असेच करावे, असा टोला लगावला. भारतीय बाजू स्पष्ट करत परराष्ट्र मंत्र्यांनी "कायदा व सत्य' भारताच्याच बाजूने असल्याचे ठणकावले आहे.

परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी चीनच्या महत्त्वाकांक्षी "वन बेल्ट वन रोड' (ओबीओआर) प्रकल्पासंदर्भातील भारताची भूमिकाही पुन्हा एकदा स्पष्ट केली. "चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (सीपेक) ओबीओआरचाच भाग म्हणून तयार करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ भारताकडून या प्रकल्पास विरोध दर्शविण्यात आला,' असे स्वराज यांनी सांगितले. ओबीओआरला भारताने विरोध दर्शविल्यामुळे चीनकडून अत्यंत संतप्त प्रतिकिया व्यक्त करण्यात आली होती.

भारत-चीनमधील तणावाचे पडसाद जागतिक राजकारणातही उमटत असून अमेरिकेकडून यासंदर्भात शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने सैन्य माघारीस स्पष्ट नकार दिल्यामुळे चीनकडून तिबेट भागात सैन्याची आक्रमक हालचाल करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वराज यांनी संसदेमध्ये स्पष्ट केलेली भारतीय भूमिका अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: