राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 17 जुलै रोजी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

या निवडणुकीदरम्यान "व्हीप' नसल्याचे स्पष्ट करत खासदार व आमदार "मनानुसार' मतदान करु शकतील, असे झैदी यांनी सांगितले. या निवडणुकीची मतमोजणी यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 20 जुलै रोजी केली जाणार आहे

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (बुधवार) येत्या 17 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. या निवडणुकीदरम्यान "व्हीप' नसल्याचे स्पष्ट करत खासदार व आमदार "मनानुसार' मतदान करु शकतील, असे झैदी यांनी सांगितले. या निवडणुकीची मतमोजणी यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 20 जुलै रोजी केली जाणार आहे.

भारताचे सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर, ही निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी खासदारांनी संसदेमध्ये; तर आमदारांनी त्यांच्या राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. याशिवाय, आणीबाणीची परिस्थिती उद्‌भविल्यास त्यांना 10 दिवसांची नोटिसही देता येईल, असे झैदी यांनी सांगितले. तसेच 10 दिवसांची नोटिस दिल्यास कोणत्याही राज्यातील आमदारास दिल्लीमध्येही मतदान करता येणार आहे. या निवडणुकीनंतरची मतमोजणी अर्थातच राजधानीमध्ये केली जाईल.

निवडणूक आयोगाच्या या औपचारिक घोषणेनंतर विविध राजकीय पक्षांकडून आता राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेस निश्‍चितच वेग येईल, असे मानले जात आहे.