लष्कर पोलिस दलात आता महिलांचा प्रवेश

पीटीआय
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

लिंगभेदावर आधारित गुन्हांचा तपास करण्यासाठी मदत होण्यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ले.जनरल कुमार यांनी दिली. सध्या लष्करात वैद्यकीय, शिक्षण, कायदे व अभियांत्रिकी विभाग तसेच सिग्नल यंत्रणा अशा ठिकाणी महिला काम करीत आहेत

नवी दिल्ली - भारतीय महिला विविध क्षेत्रांत आज सहजपणे काम करीत आहेत. देशातील संरक्षण दलांमध्येही त्या महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पेलत आहे. लष्कराच्या पोलिस सेवेतही महिलांचा समावेश लवकरच होणार आहे.

लष्कराच्या क्षेत्रात लिंगभेदाचे अडथळे दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे लष्करी पोलिस दलात अंदाजे 800 महिलांची भरती करता येणार आहे. दरवर्षी 52 महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे, असे लष्कराचे ऍडज्युटंट जनरल ले. जनरल अश्‍विनी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. लष्करात जवान म्हणून महिलांची भरती करण्याचा आपला विचार असून प्रथम लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करून याची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जून महिन्यात सांगितले होते.

"लिंगभेदावर आधारित गुन्हांचा तपास करण्यासाठी मदत होण्यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ले.जनरल कुमार यांनी दिली. सध्या लष्करात वैद्यकीय, शिक्षण, कायदे व अभियांत्रिकी विभाग तसेच सिग्नल यंत्रणा अशा ठिकाणी महिला काम करीत आहेत.

लष्करी पोलिसांचे कार्य
छावणी व लष्करी तळांवर सुरक्षा राखणे, लष्कराचे नियम आणि कायद्याचे उल्लंघन करण्यापासून जवानांना रोखणे, शांतता आणि युद्ध काळात जवान आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करणे, युद्धकैद्यांना हाताळणे आणि नागरी पोलिसांना गरजेनुसार मदत करणे आदी कामांची जबाबदारी लष्करी पोलिसांकडे असते.