लष्कराने अदा केले 'POK'तील जमिनींचे भाडे

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सीबीआयने सुरू केलेल्या चौकशीदरम्यान हाती आलेली माहिती ही धक्कादायक आहे. लष्कराच्या मालमत्ता विभागातील काही उपविभागीय अधिकाऱ्यांनी 2000 साली पाकव्याप्तमधील जमिनीचा वापर भारतीय लष्कराकडून होत असल्याचे दर्शवत हा गैरव्यवहार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमधील जमिनींचे भाडे अदा केल्याची माहिती समोर आली, असून कागदपत्री फेरफार करून केलेल्या या गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात कोणा-कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यात येत असून काही अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

सीबीआयने सुरू केलेल्या चौकशीदरम्यान हाती आलेली माहिती ही धक्कादायक आहे. लष्कराच्या मालमत्ता विभागातील काही उपविभागीय अधिकाऱ्यांनी 2000 साली पाकव्याप्तमधील जमिनीचा वापर भारतीय लष्कराकडून होत असल्याचे दर्शवत हा गैरव्यवहार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या जमिनींच्या भाड्यापोटी अदा केलेल्या रकमेमुळे सरकारी तिजोरीला 6 लाख रुपयांच्या फटका बसला असून, याप्रकरणी नौशेरातील उपविभागीय अधिकारी आर. एस. चंद्रवंशी, पटवारी, दर्शन कुमार यांसह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1969-70 दरम्यानच्या जामाबंदी रजिस्टरमधील माहितीनुसार, संबंधित जमीन ही पाकव्याप्त काश्‍मिरातील असून त्याच्या भाड्याची रक्कम लष्कराकडून अदा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या जमिनीचे मूळ मालक कोण, का फक्त कागदोपत्री हा प्रकार सुरू होता, याचा तपास सीबीआय करीत आहे.