मंगळावरील भारतीय दूतावास तुम्हाला मदत करेल: स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

स्वराज यांना करण्यात आलेली विचारणा व त्यांनी त्यास दिलेला प्रतिसाद, अशी दोन्ही ट्विट्‌स व्हायरल झाली आहे. बहुसंख्य ट्विटर युजर्सनी या ट्विट्‌समधील विनोदाचे स्वागत केले आहे

नवी दिल्ली - परदेशांत विविध संकटांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची विविध स्तरांवर सातत्याने प्रशंसा करण्यात येत असते. अशा परराष्ट्र मंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमामधून करण्यात आलेली एक विनंती व त्याला स्वराज यांच्याकडून मिळालेले उत्तर आज (गुरुवार) चर्चेचा विषय ठरले.

"सुषमाजी, मी मंगळ ग्रहावर अडकलो आहे. "मंगलयाना'च्या माध्यमामधून 987 दिवसांपूर्वी पाठविलेले अन्न आता संपत चालले आहे. द्वितीय मंगलयान केव्हा पाठविणार आहात?,'' अशी विचारणा करन या एक नागरिकाने ट्‌विटरवर केली होती. स्वराज यांनीही या तिरकस प्रश्‍नास दिलखुलासपणे उत्तर दिले. ""तुम्ही मंगळावर अडकला असला; तरी तेथील भारतीय दूतावास नक्कीच मदत करेल,'' असे स्वराज यांनी सांगितले.

स्वराज यांना करण्यात आलेली विचारणा व त्यांनी त्यास दिलेला प्रतिसाद, अशी दोन्ही ट्विट्‌स व्हायरल झाली आहे. बहुसंख्य ट्विटर युजर्सनी या ट्विट्‌समधील विनोदाचे स्वागत केले आहे; तर काही जणांनी स्वराज यांच्या कार्याची टवाळी उडविल्याबद्दल करन याच्यावर टीकाही केली आहे.