शस्त्रसंधी भंगाबाबत पाककडे निषेध

Sartaj Aziz
Sartaj Aziz

नवी दिल्ली- सातत्याने शस्त्रबंदीचे उल्लंघन, उखळी तोफा व गोळीबाराचे प्रकार आणि सीमेलगतच्या गावांवर मुद्दाम तोफगोळ्यांचा मारा करण्याच्या प्रकाराबद्दल भारताने पाकिस्तानकडे आज तीव्र निषेध नोंदविला. पाकिस्तानचे येथील उपउच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयात पाचारण करून हा निषेध नोंदविण्यात आला.


गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानतर्फे सातत्याने नियंत्रणरेषेनजीकच्या गावांवर उखळी तोफांसह गोळीबाराचे प्रकार केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक जवान हुतात्मा झाले असून, काही गावकरीही मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानतर्फे होणाऱ्या या शस्त्रबंदीच्या उल्लंघनाची गंभीर दखल भारताने आज घेतली. संरक्षण मंत्रालयाच्या पातळीवर भारतीय डीजीएमओ (डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल रणवीरसिंग यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओबरोबर हॉटलाइनद्वारे संपर्क साधून भारताची नाराजी कळविली. आज परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उपउच्चायुक्तांना पाचारण करून निषेद नोंदविला. एकाच महिन्यात चौथ्या वेळेस भारतातर्फे निषेधपत्र देण्यात आले आहे. एका जवानाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न करण्याच्या प्रकाराचाही उल्लेख या निषेधपत्रात करण्यात आला आहे. 16 ते 21 नोव्हेंबरदरम्यानच्या काळात पाकिस्तानतर्फे शस्त्रबंदीच्या उल्लंघनाचे अनेक गंभीर प्रकार घडल्याचे भारताने नमूद केले आहे. त्याचबरोबर गेल्या आठवडाभरात घुसखोरीचे पंधरा प्रकार घडल्याकडेही भारताने लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर घुसखोरांच्या मदतीसाठी पाकिस्तानतर्फे सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचा उल्लेखही भारताने केला आहे.

द्विपक्षीय चर्चेची शक्‍यता नाही
अमृतसर येथे 3 व 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या अफगाणिस्तानविषयक "हार्ट ऑफ एशिया' परिषदेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताझ अझीझ सहभागी होणार असल्याचे आज अधिकृतरीत्या सांगण्यात आले. मात्र त्या निमित्ताने भारत व पाकिस्तानदरम्यानच्या द्विपक्षीय पातळीवरल चर्चेचा मात्र इन्कार करण्यात आला. उभय देशांत अर्थपूर्ण संवादासाठी उचित वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे आणि दहशतवादी कारवाया आणि वाटाघाटी या एकाच वेळी होऊ शकणार नाहीत, ही भारताची भूमिका आहे आणि त्यावर भारत कायम आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले. या परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी करणार आहेत. चाळीस देशांचे प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com