२३ वर्षे वाळवंटात राहिल्यानंतर 'तो' परतणार भारतात

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

माझ्या चारही मुली अत्यंत लहान असताना मी घर सोडले होते, आता जेव्हा मी परतत आहे तेव्हा मला त्याच वयाचे नातू आहेत

दुबई - गेली 23 वर्षे सौदी अरेबियातील वाळवंटात अवैध्रित्या राहणारा भारताचा नागरिक लवकरच भारतात परतणार आहे. सौदी अरेबिया सरकारने जाहीर केलेल्या माफीच्या कालावधीअंतर्गत 53 वर्षांच्या भारतीय नागरिकाला भारतात परत येण्याची संधी मिळाली आहे. 

मूळचे कन्याकुमारीचे रहिवासी असणारे गणा प्रकासम राजामरियम 1994 मध्ये सौदी अरेबियाला शेतकरी मजूराचे काम करण्यासाठी गेले होते. सुरुवातीचे सहा महिने राजामरियम यांचे दरमहा उत्पन्न फक्त शंभर सौदी रियाल होते. त्यांनी 23 वर्षात वाळवंटात रहिवास केला. राजामरियम 23 वर्षात एकदाही भारतात आले नाही. 

एका वर्तमानपत्राशी बोलताना राजामरियम म्हणाले, ""माझ्या तीनही मालकांपैकी एकानेही मला पगार दिला नाही आणि म्हणून मी फरार होऊन राहण्यास सुरुवात केली.'' वाळवंटात आयुष्य काढणे हे माझ्या नशिबातच होते, असेही त्यांनी सांगितले. माझ्या चारही मुली अत्यंत लहान असताना मी घर सोडले होते, आता जेव्हा मी परतत आहे तेव्हा मला त्याच वयाचे नातू आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

सौदी अरेबियात कमवलेल्या पैशांनी त्यांनी आपल्या चार पैकी तीन मुलींची लग्न पार पाडली. त्यांच्याकडे घर, मतदान कार्ड, आधार कार्ड यांपैकी काहीच उपलब्ध नाही. या सर्व गोष्टी त्यांनी भारत सोडल्यानंतर अस्तित्वात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे आणि त्यांच्या पत्नी रोनीकयाम यांचे शेवटचे बोलणे 2015 साली त्या इस्पितळात असताना झाले होते. त्यानंतर वर्षभरात रोनीकयाम यांचा मृत्यु झाला. 

राजामरियम यांच्या भारतात परतण्यासंबंधीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. या कामात त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेतली. सौदी अरेबियात अवैध्यरित्या राहणारे हजारो भारतीय सौदी अरेबिया सरकारने जाहिर केलेल्या माफीच्या कालावधीअंतर्गत भारतात परतण्यास तयार आहेत. सौदी अरेबिया सरकारने या भारतीय लोकांना कायदेशीररित्या पुन्हा सौदी अरेबियात येण्याची परवानगी दिली आहे. 

रियादमधील भारतीय दूतावासाकडे तात्काळ पासपोर्टसाठी 26,713 अर्ज दाखल झाले त्यातील 25894 लोकांना तात्काळ पासपोर्ट पुरवण्यात आला आहे.