भारताच्या साखर निर्यातीला फटक्‍याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

अंदाज... 

1877 लाख टन 
जागतिक पातळीवर अपेक्षित साखर उत्पादन 

1845 लाख टन 
जागतिक पातळीवर अपेक्षित साखरेचा खप 

नवी दिल्ली : साखर निर्यातीबाबत युरोपीय राष्ट्रसमूहावर असलेले निर्बंध येत्या सप्टेंबरमध्ये समाप्त होणार असल्याने युरोपीय देशांकडून साखर निर्यातीला प्रारंभ झाल्यावर आंतरराष्ट्रीय साखर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फेरबदल व चढ-उतार होणे अपेक्षित आहे. भारतीय साखरेचे दर आंतरराष्ट्रीय दरांच्या तुलनेत फारसे स्पर्धात्मक नसल्याने भारतीय साखर निर्यातीला फटका बसू शकतो असा अंदाजही व्यक्त होत आहे. 

जीनिव्हामध्ये नुकताच युरोपियन युनियन साखर परिसंवाद झाला आणि त्यातील चर्चेतून वरील अनुमान काढण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये हे निर्बंध खुले झाल्यानंतर युरोपीय राष्ट्रे ही साखर आयात करणारी राष्ट्रे न राहता साखर निर्यातदार देश होतील असे परिसंवादात नमूद करण्यात आले. 

युरोपीय राष्ट्रांकडे 25 लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी साखरेचे जागतिक उत्पादन 1877 लाख टन अपेक्षित आहे. गेल्यावर्षीपेक्षा ते 6.6 टक्‍क्‍यांनी अधिक असेल व हा एक विक्रम मानला जातो. साखरेचा जागतिक पातळीवरील खप 1845 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या खपात एक टक्का वाढ होण्याचा अंदाज असला तरी कमी खपवाढीचा हा उच्चांक असेल. म्हणजे इतक्‍या कमी प्रमाणात यापूर्वी खपवाढ नोंदली गेलेली नव्हती. 32 लाख टन अतिरिक्त साठ्यामुळे साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर दबाव राहील आणि सुमारे 15 ते 15 सेंट प्रति पौंड दर अपेक्षित असेल. 

ब्राझील आणि भारत हे जगातले प्रमुख साखर उत्पादक आणि निर्यातदार देश मानले जातात. परंतु ब्राझीलमधील साखरेचे उत्पादनमूल्य हे पौंडाला 14.5 सेंट आहे तर भारतीय साखरेचे उत्पादन मूल्य 19 सेंट प्रतिपौंड होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय साखर पिछाडीवर राहते. 2019 मध्ये ब्राझीलने 'जीएम' म्हणजेच 'जेनेटिकली मॉडिफाइड' ऊस उत्पादनाला परवानगी देण्याचे ठरविले असल्याचे समजते. यामुळे तर उत्पादनवाढ मोठ्या प्रमाणात होऊन तेथील साखर आणखी स्वस्तात उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे परिणामी भारतीय साखर निर्यातीला देखील मोठा पटका बसण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

परिसंवादात भारतातील नोटाबंदीच्या विषयावरही चर्चा झाली आणि राजकीय कारणांमुळे साखर बाजाराला कसा फटका बसत आहे यावरही परिसंवादात चर्चा झाली. परिसंवादात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलिप वळसे पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.