कणखर इंदिराजींचे स्मरण

Indira Gandhi
Indira Gandhi

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्यांचा दुर्गा असा गौरव केला होता, त्या इंदिरा गांधी यांचा पंतप्रधानपदाचा कालखंड परिकथा वाटावी इतका विस्मयकारक आहे. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासात पंतप्रधान होण्याचा मान मिळालेल्या त्या एकमेव महिला आहेत. बांगलादेशची निर्मीती, गरिबी हटावची घोषणा, पोखरणचा अणुस्फोट, आणीबाणी, सत्तांतर आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार यांच्याबरोबरच हरितक्रांती ही त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडातील अत्यंत महत्वाची घटना आहे. इंदिराजींची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त...

एखाद्या देशाची शक्ती त्याने इतरांपासून काय उधार घेतले, यावर नव्हे तर त्याने स्वतः काय कमावले, यावर मोजली जाते, असे इंदिरा गांधी म्हणत असत. याच विचाराला अनुसरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या म्हणून मिळालेला राजकीय वारसा त्यांनी अत्यंत सक्षमपणे पुढे चालविला. त्या 1959 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष झाल्या होत्या. त्यांनी पंडितजींच्या निधनानंतर 1964 मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात माहिती आणि प्रसारमंत्री स्वीकारले. ताश्‍कंदमध्ये लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. गुलझारीलाल नंदा यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. कॉंग्रेसमध्ये त्यावेळी सत्तासंघर्ष सुरू झाला. कॉंग्रेस संसदीय नेतेपदाच्या निवडीसाठी मतदान झाले. इंदिराजींनी मोरारजीभाई देसाई यांचा पराभव केला.

इंदिराजींनी 1966 मध्ये पंतप्रधान पदाचा कारभार हाती घेतला तेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा जाणवत होता. महागाईने कळस गाठला होता. त्यांची जडणघडण प्रामुख्याने साम्राज्यवादविरोधी आणि समाजवादी विचारांत झाली होती. सोव्हिएत रशियाचा त्यांच्यावर प्रभाव होता, पण टंचाईच्या काळात अमेरिकेचे पंतप्रधान लिंडेन जॉन्सन यांच्याकडे त्यांनी अन्नधान्य आणि आर्थिक मदत मागितली. पीएल-480 कार्यक्रमांर्तंगत गहू आणि आर्थिक मदत पुरविण्याचे आश्‍वासन जॉन्सन दिले, पण त्यांनी खूपच जाचक अटी टाकल्या. इंदिराजींना त्या स्वीकारल्या नाहीत. अमेरिकेने मदत देण्यास विलंब लावला. 

एकीकडे देश कठीण परिस्थितीतून जात असताना पक्षांर्तंगत आव्हानाचा सामना त्यांना करावा लागला. ज्यांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यांनीच विरोध करण्यास सुरवात केला. निजलिंगप्पा कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना 1969 मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कॉंग्रेस इंडीकेटची स्थापना केली.

प्रत्येक टप्प्यावर राजकीय आव्हानांचा सामना करताना त्यांनी लोककल्याणचे कार्यक्रम जोमाने राबविले. अन्नधान्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी देशात हरितक्रांती झाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या काळात ओलिताखाली क्षेत्र दुप्पट झाले. धान्य उत्पादन 72 दशलक्ष टनांवरून 145 दशलक्ष टनापर्यंत पोहोचले. तेल बियांचे उत्पादन 1961 मध्ये गरजेच्या केवळ पाच टक्के इतके होते. ते 1984 पर्यंत सत्तर टक्के इतके वाढले. त्यांनी घडवून आणलेल्या या हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यांनी 1969 ते 71 या कालखंडात खासगी क्षेत्रातील 14 बॅंकाचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे हक्क करणे, रुपयाचे अवमूल्यन, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना गती देण्यासाठी विविध निर्णय घेतले. त्यावरच 1971 मध्ये गरिबी हटावची घोषणा देऊन मुदतपूर्व निवडणुकीला त्या सामोऱ्या गेल्या. त्यांना बहुमत मिळाले. पूर्व पाकिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणात निर्वासित येत असताना इंदिराजींनी त्यात हस्तक्षेप करून बांगलादेशची निर्मीती केली. या त्यांच्या धोरणाने देशाची मान जगात उंचावली. त्यानंतर 1974 मध्ये राजस्थानातील पोखरणमध्ये अणुस्फोट घडवून जगाला भारताच्या सामर्थ्यांची चुणूक दाखविली. याने लोकांत देशप्रेम जागे झाले.

हे घडत असताना दुसरीकडे आर्थिक आघाडीवर मात्र देशावर संकटाचे ढग आले होते. पाकिस्तानबरोबरच्या युद्धाचा देशावर मोठा आर्थिक ताण पडला होता. पेट्रोलियम पदार्थाच्या किंमती भडकल्य होत्या. जागतिक स्तरावर मंदीची स्थिती होती. महागाईने कळस गाठला होता. याविरुद्ध देशात विविध ठिकाणी निदर्शने सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर जयप्रकाश नारायण यांनी "इंदिरा हटाव‘ची घोषणा केली. आंदोलन जोरात सुरू झाले. त्याला पाठिंबा मिळू लागला. 

याच काळात राजनारायण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला. त्यात इंदिराजींनी सरकारी यंत्रणेचा प्रचारासाठी वापर केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांची निवड सहा वर्षांसाठी रद्द ठरविण्यात आली. इंदिराजींनी आपल्या पदावरून पायउतार व्हायला नकार देत देशात 25 जून 1974 ला आणीबाणी लागू केली. आणीबाणीत वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. आणिबाणी हा देशाच्या इतिहासातला काळा कालखंड होता, असे त्यांचे विरोधक म्हणतात. इंदिराजींचे समर्थक मात्र आणीबाणी कशी गरजेची होती, याचसंबंही अनेक मुद्दे मांडतात. पुढे 1977 मध्ये त्यांनी आणिबाणी मागे घेऊन देशात निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला. त्या स्वतःही हरल्या. जनता पक्ष सत्तेवर आला. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले पण अंर्तगत संघर्षामुळे जनता पक्षाचे सरकार पडले. त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. मोठ्या फरकाने इंदिराजींनी बहुमत मिळविले. 

त्यानंतर पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ सुरू झाली. त्याविरूद्ध ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम लष्कराने हाती घेतली. सुवर्णमंदिरात घुसून जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून इंदिराजींची त्यांच्याच दोन सुरक्षारक्षकांनी 31 ऑक्‍टोबर 1984 रोजी हत्या केली.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हवामान व सागरी विकास ही खाती त्यांच्या कालखंडात सुरू झाली. "या देशाची सेवा करताना मला मरण आले तर तो मी माझा सन्मान समजेन. माझ्या रक्ताचा एकएक थेंब या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला सुरक्षित ठेवील,‘ असे म्हणणाऱ्या इंदिराजींनी देश सर्व क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न करतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावणारी भूमिका पार पाडली. त्यांनी विनम्र अभिवादन!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com