जीएसटीमुळे महागाई कमी होण्याचा अंदाज

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

महसूल व वित्त विभागाच्या आकलनानुसार महागाई दर दोन टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्या ग्राहक व करदात्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार अशा दोघांना कर द्यावा लागतो. त्यामुळे व्यवसाय आणि ग्राहकांसाठी किमतींमध्ये वाढ होत जाते. याचा परिणाम महागाईवर होऊन महागाईत वाढ होत असते

गुलमर्ग - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा लागू झाल्यानंतर महागाई दोन टक्‍क्‍यांनी कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज महसूल सचिव हसमुख अधिया यांनी वर्तविला.

जीएसटी परिषदेची येत्या आठवड्यात सोने, सिगारेट आणि बिस्किटांसारख्या सामग्रीचे दर ठरविण्याबाबत बैठक होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अधिया यांनी जीएसटीच्या अनुकूल परिणामांबाबत माहिती दिली. अधिया म्हणाले, की जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे महागाई नियंत्रणात येण्याचा अंदाज आहे. महसूल व वित्त विभागाच्या आकलनानुसार महागाई दर दोन टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्या ग्राहक व करदात्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार अशा दोघांना कर द्यावा लागतो. त्यामुळे व्यवसाय आणि ग्राहकांसाठी किमतींमध्ये वाढ होत जाते. याचा परिणाम महागाईवर होऊन महागाईत वाढ होत असते.

जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेसह व्यवसायवृद्धीला चालना मिळेल. जीसटीच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने व्यापार व उद्योगविश्‍वाशी चर्चा केली असून, या संदर्भातील माहितीही देण्यात आलेली आहे, असेही अधिया यांनी या वेळी सांगितले.