डिझेल तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

दुबईतून चेन्नईत आलेले 14 कंटेनर "डीआरआय'कडून जप्त

नवी दिल्ली : डिझेल तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट महसुली गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उघडकीस आणले आहे. या प्रकरणातील सूत्रधार आणि हवाला व्यावसायिकासह चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली.

आंध्र प्रदेश राज्याच्या गुप्तचर विभागाने महसुली गुप्तचर संचालनालयाला या डिझेल तस्करीची माहिती दिली होती. मिनरल स्पिरिटच्या नावाखाली डिझेलची तस्करी भारतात सुरू होती. काकिनाडा आणि चेन्नईमधील रॅकेट यामागे होते. दुबईतून कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात डिझेल चेन्नई बंदरावर आणले जाई. नंतर त्याची तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यात बेकायदा विक्री करण्यात येत असे. गुप्तचर संचालनालयाने एकाचवेळी हैदराबाद आणि चेन्नईत छापे घातले. या छाप्यामध्ये चेन्नई बंदरावर डिझेलचे 14 कंटेनर जप्त करण्यात आले. यामध्ये सुमारे तीन लाख लिटर डिझेल होते. या प्रकरणातील आयातदार, एजंट, वाहतूकदार, निरीक्षक आणि हवाला व्यावसायिक यांच्याशी निगडित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

बाजारभावापेक्षा 40 टक्के कमी दर
डिझेल तस्करी केलेले असल्याने ही टोळी त्याची विक्री बाजारभावापेक्षा 40 टक्के कमी दराने करीत होती. यावर कोणतेही कर नसल्यामुळे टोळीला स्वस्त विक्री करणे परवडत होते. परकी व्यापार धोरणानुसार, डिझेलच्या आयातीवर निर्बंध आहेत. केवळ तेल कंपन्यांना डिझेल आयात करण्याची परवानगी आहे. यासाठी त्यांना पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी आवश्‍यक असते.

Web Title: International Racket of Diesel Smuggling