अवघे जग झाले "योग'मय

पीटीआय
मंगळवार, 20 जून 2017

माझा योगासनांना विरोध नाही; पण आंतरराष्ट्रीय योग दिनासारख्या पब्लिसिटी स्टंटला परवानगी दिली जाऊ शकत नाही. मी स्वत: योगासनांचा प्रचार करत नाही. बिहार सरकार योग दिनाच्या कार्यक्रमांत सहभाग घेणार नाही.
- नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार

नवी दिल्ली - राजधानातील "कॅननॉट प्लेस' येथील "सेंट्रल पार्क'मधून न्यूयॉर्कमधील "सेंट्रल पार्क'पर्यंत अवघे जग उद्या (ता. 21) योगमय होणार आहे. तिसऱ्या जागतिक योग दिनानिमित्त लखनौमध्येही भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष योग सत्रामध्ये 55 हजार लोक सहभागी होणार आहेत. योग दिनानिमित्त देशभर विविध ठिकाणांवर पाच हजार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे "आयुष' मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

जगभरातील दीडशे देशांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्या त्या देशातील भारतीय उच्चायुक्तालयांनी या कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवर, लंडनमधील ट्राफलगार स्क्वेअर आणि न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क परिसरामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कडक बंदोबस्त
भारतामध्ये लखनौमधील रमाबाई आंबेडकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात 55 हजार लोक सहभागी होणार आहेत. या मैदानाभोवती कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात केले जातील. पंतप्रधान मोदी यांनी आज सोशल मीडियावर भुतान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, चीन आणि जपानमधील योगसत्रांची छायाचित्रे शेअर केली. राजधानी दिल्लीमध्ये आठ ठिकाणांवर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

व्यक्ती, संस्थांचा गौरव
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर योगासनांच्या प्रचार आणि प्रसारामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने डिसेंबर 2014 मध्ये 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला होता. यासाठी भारत सरकारने जोरदार प्रयत्न केले होते.

माझा योगासनांना विरोध नाही; पण आंतरराष्ट्रीय योग दिनासारख्या पब्लिसिटी स्टंटला परवानगी दिली जाऊ शकत नाही. मी स्वत: योगासनांचा प्रचार करत नाही. बिहार सरकार योग दिनाच्या कार्यक्रमांत सहभाग घेणार नाही.
- नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार