महाभारत काळापासून भारतात इंटरनेट सेवा ; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Internet Service is From Mahabharat says Tripura CM Viplav Dev
Internet Service is From Mahabharat says Tripura CM Viplav Dev

आगरताळा : "इंटरनेट व उपग्रह हे काही आजचे तंत्रज्ञान नाही, महाभारत काळापासून हे तंत्रज्ञान अस्तित्वात आहे,' असा दावा करणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. मात्र, आपल्या मतावर ठाम राहत देव यांनी टिकाकारांनाच लक्ष्य करीत "संकुचित मानसिकतेच्या लोकांचा यावर विश्‍वास बसणे कठीण आहे. असे लोक आपल्या देशाला कमी लेखतात व दुसऱ्या देशांना उच्च समजतात; पण सत्यावर विश्‍वास ठेवा. तुम्हीही वाट चुकू नका व दुसऱ्यांची दिशाभूल करू नका,' असा सल्ला बुधवारी दिला. 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भात आगताळा येथे मंगळवारी (ता.17) झालेल्या विभागीय कार्यशाळेत जाहीर भाषणात बोलताना विप्लव देव यांनी इंटरनेटचा शोध भारताने लाखो वर्षांपूर्वी लावला असल्याचा दावा केला होता. ""ही वस्तुस्थिती अनेकांच्या पचनी पडणार नाही; पण जर तेव्हा इंटरनेट नसेल तर कुरुक्षेत्रावर चाललेले युद्ध संजय कसे पाहू शकेल व ध्रुतराष्ट्राला त्याचे वर्णन कसे सांगेल?, असा सवाल करीत म्हणजेच त्या काळी भारतात इंटरनेट, उपग्रह व तंत्रज्ञान अस्तित्वात होते, हे सत्य आहे,'' असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

तंत्रज्ञानसंपन्न देशात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले होते. जे देश अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दावा करतात, ते भारतीय बुद्धिमत्तेसाठी पैसे मोजून आपले तंत्रज्ञान अद्ययावत करतात, असा आरोपही त्यांनी केली होता. याचा दाखला म्हणून त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे उदाहरण दिले होते. "मायक्रोसॉफ्ट जरी अमेरिकेची कंपनी असली तरी तेथे काम करणारे बहुतांश भारतीय अभियंते असल्याचे देव म्हणाले होते. 

दरम्यान, इंटरनेटचा जनक भारत असल्याच्या विप्लव देव यांच्या दाव्याची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्यात आली. त्यांच्या दाव्यावर अनेक विनोद फेसबुक, ट्‌विटरवर झळकू लागले. त्यातील काही नमुने :

- महाभारत काळापासून भारतात इंटरनेट आहे, हे विप्लव देव यांचा दावा खरा आहे. म्हणूनच कुंती कर्णाला सूर्याकडून डाउनलोड करू शकली. 

- दुर्योधनाने पूर्वी पाठविलेला "मेल' विप्लव देव यांनी नुकताच पाहिला असण्याची शक्‍यता आहे. 

- महाभारतातील संजयला दैवी जिओ एचडी पॅक देण्यात आला होता. त्यामुळेच युद्धात काय चालले आहे, हे त्याला समजत होते 

- विप्लव देव म्हणतात, महाभारतात इंटरनेट होते, खरेच, इंटरनेट जुने झाले; पण मूर्खपणा अजूनही नवाच आहे. 

- विप्लव देव त्या वेळी दळणवळण मंत्री होते का? हे मंत्री काय खातात कोण जाणे? माझ्या जिममध्ये मी भीमाला प्रशिक्षण दिले असे देव म्हणाले नाहीत, हे नशीब. 

- यामुळे काही प्रश्‍न उपस्थित राहतात. चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हे अभिमन्यूने "क्‍यूरा'ला का विचारले नाही?. "सिरी' सर्व करीत असताना कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन संजयला का करावे लागले?, कृष्णाने भगवदगीतेचे कथन फेसबुक लाइव्हवर करायले हवे होते. 

- महाभारत काळात "बीएसएनल', "एमटीएनएल'ची स्थिती कशी होती?, नेहमीप्रमाणेच वाईट? की त्या वेळी अस्तित्वात असलेले "जिओ' इंटरनेट वापरण्याचा सल्ला युधिष्ठीराने सर्वांना दिला होता?. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com