भारतातील ताजमहाल इसीसच्या निशाण्यावर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

इसीस या दहशतवादी संघटनेने नुकतेच एक ग्राफिक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये भारतातील ताजमहाल हे "न्यू टार्गेट' असल्याचे लिहिले आहे. दहशतवाद्यांसंदर्भात वृत्त देणाऱ्या एसआयटीई नावाच्या समूहाने याबाबतची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - इसीस या दहशतवादी संघटनेने नुकतेच एक ग्राफिक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये भारतातील ताजमहाल हे "न्यू टार्गेट' असल्याचे लिहिले आहे. दहशतवाद्यांसंदर्भात वृत्त देणाऱ्या एसआयटीई नावाच्या समूहाने याबाबतची माहिती दिली आहे.

इसीसच्या अहवाल उम्मत मिडिया सेंटरने 14 मार्च रोजी "टेलिग्राम' या मेसेंजर ऍपवर एक ग्राफिक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ताजमहालचे चित्र असून त्याखाली "न्यू टार्गेट' असे इंग्रजी अक्षरात लिहिले आहे. ग्राफिकमध्ये एक मोटार ताजमहालच्या दिशेने जाताना दिसत आहे. तसेच एक शस्त्रास्त्रधारी व्यक्ती पाठमोरा उभा असल्याचेही दिसत आहे. या ग्राफिवरून एखादी मोटार ताजमहालमध्ये घुसवून स्फोट घडवून आणण्याचा इसीसचा विचार असल्याचे दिसून येत आहे.

'ताजमहाल ही भारताची ओळख आहे. जर त्यावर काही हल्ला झाला तर त्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे तर जगभर उमटतील', अशा प्रतिक्रिया गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केल्या आहेत. भारतात शिरण्याचा इसीसचा हा प्रयत्न असून भारतीय मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी इसीसचे प्रयत्न सुरू असल्याचे या ग्राफिकवरून दिसत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: ISIS warns of attack on India, Taj Mahal on the hit list