अंतराळ तंत्रज्ञानात भारत लवकरच तिसरा - किरणकुमार

अंतराळ तंत्रज्ञानात भारत लवकरच तिसरा - किरणकुमार

बेळगाव - भारताने चांद्रयान यशस्वीरीत्या पाठविल्यानंतर इस्रोकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर भारताने एकाचवेळी अनेक उपग्रह सोडत जगाचे लक्ष वेधून घेतले. येणाऱ्या काळात अंतराळ तंत्रज्ञानात भारत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार असून चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे आम्ही मिळवले असल्याची माहिती इस्रोचे माजी अध्यक्ष व पद्मश्री ए. एस. किरणकुमार यांनी दिली.

जीएसएस महाविद्यालयामध्ये मंगळवारपासून सुरू झालेल्या इन्स्पायर इंटर्नशिप विज्ञान शिबिराचे उद्‌घाटन इस्रोचे माजी अध्यक्ष किरणकुमार यांच्या हस्ते झाले.

किरणकुमार म्हणाले,‘१९५७ मध्ये रशियाने पहिला उपग्रह अंतराळात सोडला. तेव्हापासून रशिया व  अमेरिका यांच्यात उपग्रहावरून स्पर्धा निर्माण झाली. १९९१ पासून इस्रोने वेगाने काम हाती घेत हवामान, संपर्क सेवा, मच्छीमारांना समुद्रामधील घडामोडी कळाव्यात यासाठी उपग्रह पाठविले. याचा चांगला लाभ झाला. आपत्ती निवारणासाठी उपाययोजना हाती घेण्यास मदत झाली.’’

अंतराळ तंत्रज्ञानात देशाने मोठी प्रगती केली असून सार्क परिषदेत मोडणाऱ्या देशांसाठीही उपग्रह सोडून भारताने मोठी कामगिरी केली आहे, अंतराळात उपग्रह सोडण्याची क्षमता जगातील पाच, सहा देशांमध्येच आहे. यामध्ये भारत अग्रस्थानी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामुळे जग जवळ आले असून केंद्र सरकारने इस्त्रोला नेहमी चांगले सहकार्य केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अंतराळ क्षेत्रात भारत मोठी प्रगती करील, असेही किरणकुमार म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साऊथ कोंकण सोसायटीचे चेअरमन आर. डी. शानभाग होते. प्राचार्य एन. डी. नागराज यांनी स्वागत केले. प्रा. एस. एम. देशपांडे यांनी कार्यशाळेबाबत माहिती दिली. शिबिरामध्ये जिल्ह्यामधील विज्ञान शाखेच्या १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये ७८ विद्यार्थी व ७२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. डॉ. रघुनाथ ओ. आर. व डॉ. सराह यांनीही मार्गदर्शन केले.

साराभाई यांच्यामुळे..
प्रसिद्ध वैज्ञानिक विक्रम साराभाई यांनी जगभरातील वैज्ञानिकांच्या भेटी घेऊन माहिती जमवली. त्यांच्या पुढाकारामुळे भारताने १९६३ मध्ये उपग्रह सोडला. त्यानंतर विशाखापट्टणमजवळील श्रीहरीकोटा येथे उपग्रह सोडण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले, अशी माहिती किरणकुमार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com