इस्त्रोचा विश्वविक्रम; एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

या उपग्रहातील 101 उपग्रह हे प्रवासी असून त्यात अमेरिकेच्या 96 उपग्रहांसह इस्त्राईल कझाकस्तान, नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या इस्त्रोच्या पाच आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पाच उपग्रहांचाही समावेश आहे.

चेन्नई - श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम आज (बुधवार) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला. एकाच प्रक्षेपकाद्वारे एवढे उपग्रह पाठविणारा भारत हा पहिलाच देश असून ही एक ऐतिहासिक घटना आहे.

प्रकल्प तयारी पुनरावलोकन समिती आणि लाँच ऑथोरिजेशन मंडळाने संमती दिल्यानंतर आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी इस्त्रोने ही ऐतिहासिक कामगिरी केली. पीएसएलव्ही-सी37/कॅट्रोसॅट2 श्रेणीतील हा उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या झेपावला. पीएसएलव्ही-सी37चे हे 39 वे उड्डाण असून या वेळी त्याने 104 उपग्रह नेले. आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या उपग्रहांचाही यामध्ये समावेश आहे. इस्त्रोच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

यापूर्वी एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह पाठविण्याचा विक्रम रशियाच्या नावावर आहे, त्यांनी एकाच प्रक्षेपकातून 37 उपग्रह पाठविले होते. भारताने 2015 मध्ये 23 उपग्रह यशस्वीरीत्या पाठविले होते, परंतु आजची झेप ही सर्वांत मोठी होती. 104 उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणासह भारताने नवा इतिहास रचला. इस्त्रोने या मोहिमेसाठी एक्‍सएल श्रेणीतील सर्वांत ताकदवान प्रक्षेपक वापरला. यापूर्वी तो चंद्रयान या मोहिमेसाठी वापरण्यात आला होता. या उपग्रहातील 101 उपग्रह हे प्रवासी असून त्यात अमेरिकेच्या 96 उपग्रहांसह इस्त्राईल कझाकस्तान, नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या इस्त्रोच्या पाच आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पाच उपग्रहांचाही समावेश आहे.