जगन्नाथाच्या मंदिरी पुन्हा दरळवणार कस्तुरी गंध

jagannath temple
jagannath temple

नेपाळ सरकारकडून पुरवठ्याची तयारी; जुना साठा संपणार

भुवनेश्‍वर: जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या पूजाअर्चेसाठी नेपाळ सरकारने कस्तुरी देण्याची तयारी दर्शविली आहे. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत दौऱ्यामध्ये याबाबत उभय देशांत चर्चा झाली. भंडारी यांनीही देवस्थानला कस्तुरीचा पुरवठा करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.

भारतामध्ये कस्तुरीच्या विक्रीवर बंदी आहे. नेपाळमध्ये राजसत्ता असताना दर महिन्याला भगवान जगन्नाथाच्या पूजेसाठी कस्तुरी मिळत असे. 2008 मध्ये नेपाळमधील राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर कस्तुरीचा पुरवठा बंद झाला होता. ओडिशा सरकारने 2014 मध्ये याच विषयावर भारताच्या परराष्ट्र सचिवांना पत्र लिहिले होते.

भारत आणि नेपाळ यांच्यातील परराष्ट्र संबंधांना शेकडो वर्षांची परंपरा असून, हे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी आम्ही जगन्नाथ देवस्थानाला कस्तुरीचा पुरवठा करू, असे विद्यादेवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. नेपाळच्या राजघराण्याकडून 2002 मध्ये शेवटची कस्तुरी मिळाली होती. हा साठाही आता संपुष्टात येत असल्याचे देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेपाळचीच कस्तुरी का?
नेपाळमधील कस्तुरी सर्वोत्कृष्ट समजली जाते, तिचा दर्जाही अन्य भागांत मिळणाऱ्या कस्तुरीपेक्षा अधिक चांगला असतो. पाच ग्रॅम कस्तुरी विविध प्रकारच्या गंधांमध्ये मिसळून त्याचा लेप भगवान जगन्नाथाच्या मुखावर लावला जातो. साधारणपणे रथयात्रा आणि विशेष धार्मिक उत्सवाप्रसंगी कस्तुरीच्या लेपाचा वापर केला जातो. बऱ्याचदा देवस्थानला भक्तांकडून दानस्वरूपात कस्तुरी मिळते; पण तिचा दर्जा नेपाळ सरकारकडून मिळणाऱ्या कस्तुरीसारखा नसतो.

सोन्यापेक्षा महाग
अस्सल कस्तुरी ही सोन्यापेक्षा तिप्पट महाग असते, असे जाणकार सांगतात. देवस्थानला कस्तुरी दानस्वरूपात मिळत असल्याने अधिकारी तिचे बाजारमूल्य लक्षात घेत नाहीत. नेपाळकडून पूर्वी दानस्वरूपात कस्तुरी मिळत असे. आता जर नेपाळला त्याची विक्री करायची असेल तरीदेखील आम्ही ती घ्यायला तयार आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष मान
पूर्वी नेपाळच्या राजघराण्याकडून ही कस्तुरी मिळत असल्याने राजघराण्यातील सदस्यांना देवस्थान समितीकडूनही विशेष मान दिला जात होता. या सदस्यांना रत्नवेदीवर जाऊन भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रादेवी यांचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जात असे. नेपाळच्या अध्यक्षांनी नुकतीच जगन्नाथ मंदिरास भेट देऊन प्रार्थना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com