माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला 12 वी पास

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

चौटाला यांनी तुरुंगामध्येच आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रण केला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग सेंटर या तिहार तुरुंगामधील शाळेत परीक्षा अर्ज भरला. 23 एप्रिल रोजी त्यांनी बारावीचा शेवटचा पेपर दिला होता

चंदीगढ - शिक्षणाचा ध्यास मानवाला अखेरच्या श्‍वासापर्यंत शांत बसू देत नाही. त्यातही आयुष्यात महत्त्वाची पदे उपभोगूनही बारावीची परीक्षा पास होण्याची जिद्द उराशी बाळगणेही नसे थोडके! हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला (वय 88) तिहारच्या तुरुंगामध्ये बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे चौटाला यांचा बीएपर्यंत पदवीचे शिक्षण घेण्याचा मानस असल्याचे त्यांचे धाकटे चिरंजीव अभय सिंह चौटाला यांनी सांगितले.

ओमप्रकाश चौटाला शिक्षक भरती गैरव्यवहारामध्ये दोषी आढळल्याने त्यांना दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर चौटाला यांनी तुरुंगामध्येच आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रण केला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग सेंटर या तिहार तुरुंगामधील शाळेत परीक्षा अर्ज भरला. 23 एप्रिल रोजी त्यांनी बारावीचा शेवटचा पेपर दिला होता. त्या वेळी ते पॅरोल रजेवर तुरुंगाबाहेर होते. मात्र, परीक्षा केंद्र हे तुरुंगात असल्याने ते तेथे परीक्षा देण्यासाठी जात असत, असे अभयसिंह यांनी सांगितले.

चौटाला यांना गेल्या महिन्यात नातू व खासदार दुष्यंतसिंग चौटाला यांच्या लग्नसमारंभासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. गेल्या साडेचार वर्षांपासून चौटाला हे तुरुंगवासात आहेत.

ओमप्रकाश चौटाला यांच्याबद्दल बोलताना त्यांचे चिरंजीव अभयसिंह चौटाला म्हणाले, ""मी शाळेमध्ये असताना माझे आजोबा चौधरी देवीलाल हे राजकारणात सक्रिय होते. त्यांच्यानंतर कुटुंबातील मोठा व कर्ता म्हणून ही जबाबदारी ओमप्रकाश चौटाला यांच्यावर पडली. त्यामुळे त्याकाळात शिक्षणाकडे दुर्लक्ष झाली. मात्र, सध्या तुरुंगात असताना ते तुरुंग ग्रंथालयात आवर्जून जातात. त्याचबरोबर तुरुंग अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी आवडीची पुस्तकेही मागवून घेतली आहेत. रोजच्या रोज वर्तमानपत्रे वाचणे हा त्यांचा छंद असल्याचेही अभयसिंह यांनी सांगितले.

ओमप्रकाश चौटाला यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतरही कैदी शिक्षणाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील, तसे झाल्यास त्यांच्या कार्याचे सार्थक झाल्यासारखे असेल, अशी आशाही अभयसिंह चौटाला यांनी या वेळी व्यक्त केली.

मनु शर्मांची प्रेरणा
ओमप्रकाश चौटाला यांनी माजी मुख्यमंत्री मनु शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुरुंगामध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मनु शर्मा यांना 1999 मध्ये जेसिका लाल खून प्रकरणात कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्यांनी कारागृहातच एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.