जलिकट्टू- आंदोलकांनी पेटविले पोलिस ठाणे

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

चेन्नई- तमिळनाडूमध्ये जलिकट्टूच्या स्पर्धांवरील बंदी कायमस्वरुपी उठविण्याच्या मागणीकरीता येथील मरीना बीचवर मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीने आईस हाऊस पोलिस ठाण्याला आग लावली. 

चेन्नई- तमिळनाडूमध्ये जलिकट्टूच्या स्पर्धांवरील बंदी कायमस्वरुपी उठविण्याच्या मागणीकरीता येथील मरीना बीचवर मोठ्या प्रमाणावर जमलेल्या गर्दीने आईस हाऊस पोलिस ठाण्याला आग लावली. 

तमिळनाडूमधील परिस्थिती आणखी हिंसक बनू लागल्याने पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये रविवारी जलिकट्टूचे आयोजन करण्यात आले. 'प्राण्यांशी क्रूर वर्तणूकविरोधी कायदा, 1960'ला तमिळनाडूचा विशेष अपवाद करून हा अध्यादेश काढण्यात आला. परंतु, यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा आणि प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेवर बंदी घालावी यासाठी आंदोलनकर्त्यांनी सोमवारीही निदर्शने सुरूच ठेवली. 

पोलिसांनी सोमवारी पहाटे मरीना बीचवरून आंदोलकांना बाहेर काढून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी तिथेच राष्ट्रगीत गायला सुरवात केली. काही आंदोलकांनी समुद्राच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याच्याही धमक्या दिल्या. 

'जलिकट्टू'च्या समर्थनार्थ करण्यात येणारी निदर्शनांचा आज सातवा दिवस असून ही निदर्शने वाढतच आहेत, त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना मरीना बीचवरून बाहेर काढण्यास सुरवात केली. दरम्यान, तमिळनाडू विधानसभेत यासंदर्भातील विधेयक मांडण्यात येणार आहे हे लक्षात आंदोलकांनी आता गर्दी पांगविण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती पोलिसांनी केली. 

हे विधेयक संमत झाल्यानंतर बैलांसोबत खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे नियमितपणे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आंदोलनक मात्र या आश्वासनानंतरही मागे हटायला तयार नाहीत. जलिकट्टूच्या मुद्द्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी करीत समुद्रकिनाऱ्याकडे निदर्शनांसाठी धाव घेतली. कडाक्याची थंडी असतानाही रात्रीच्या वेळी आंदोलकांनी मरीना बीचवर धरणे धरले. यामध्ये महिलादेखील आपल्या मुलांसह सहभागी झाल्या आहेत. त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला. त्यांनी मग बळाचा वापर करीत आंदोलकांना बीचवरून बाहेर काढण्यास सुरवात केली. 

काही आंदोलकांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिथून बाहेर पडण्यास सुरवात केली. मात्र, त्यांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जमून पुन्हा आंदोलन सुरू ठेवले. 
आमची विद्यार्थ्यांना विनंती आहे की आम्हाला पांठिबा द्या. आम्ही वेगळ्या देशातील नाही, तर भारतीयच आहोत, असे मरीना बीचवरील एका निदर्शकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. 

जलिकट्टूवरून निर्माण झालेला तणाव अजूनही निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याची तीव्रता आज (सोमवार) कमी होते का याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. शनिवारी अध्यादेश काढल्यानंतर राज्यात जलिकट्टूचा धुराळा उडत असतानाच तीव्र विरोधामुळे मुख्यमंत्र्यांना उद्‌घाटन न करताच चेन्नईला परतावे लागले. मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी काल आलंगनल्लूर येथे जलिकट्टूचे उद्‌घाटन करणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र राज्यात जलिकट्टू आयोजन करण्यासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती. राज्यात आज सर्वत्र जलिकट्टूची दंगल होत असताना पुडुकोट्टई येथे खेळादरम्यान तिघांच्या मृत्यूने गालबोट लागले. तसेच 129 जण जखमी झाल्याची घटना घडली. 

Web Title: Jallikattu protests: Angry mob set Ice House police station on fire near Marina Beach