पूंछ: पाकच्या गोळीबारात जवानासह 9 वर्षांची मुलगी मृत्युमुखी

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

राजौरी सेक्‍टरमधील भारतीय लष्कराच्या चौक्‍यांवर तैनात असलेले नाईक मुदस्सर अहमद हे पाकच्या गोळीबारात हुतात्मा झाले. अहमद हे जम्मु काश्‍मीर राज्यातील त्राल या जिल्ह्यामधील नागरिक होते

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील पूंछ जिल्ह्यामधील राजौरी सेक्‍टर येथे, प्रत्यक्ष ताबारेषेजवळ आज (सोमवार) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारतीय लष्कराच्या जवानासह एक 9 वर्षीय मुलगीही मृत्युमुखी पडली.

राजौरी सेक्‍टरमधील भारतीय लष्कराच्या चौक्‍यांवर तैनात असलेले नाईक मुदस्सर अहमद हे पाकच्या गोळीबारात हुतात्मा झाले. अहमद हे जम्मु काश्‍मीर राज्यातील त्राल या जिल्ह्यामधील नागरिक होते. या भागात आज सकाळपासूनच पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत असून भारतीय लष्कराकडूनही पाकच्या या आगळिकीस तीव्र प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यातही पाककडून एलओसीजवळील गावांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात गावामधील व्यापार केंद्र व पोलिस चौक्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.