काश्मीर : किश्तवार येथे कारमध्ये स्फोट, 1 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

किश्तवारमधील जुन्या बस स्थानकाजवळ सोमवारी रात्री (जेके 17-5097) ही कार पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. आज सकाळी या कारचा दरवाजा उघडल्यानंतर स्फोट झाला. या स्फोटात कॉन्ट्रॅक्टर राज कुमार हा गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील जम्मू भागातील किश्तवार येथे आज (मंगळवार) सकाळी पार्किंगमधील कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

किश्तवारमधील जुन्या बस स्थानकाजवळ सोमवारी रात्री (जेके 17-5097) ही कार पार्किंगमध्ये लावण्यात आली होती. आज सकाळी या कारचा दरवाजा उघडल्यानंतर स्फोट झाला. या स्फोटात कॉन्ट्रॅक्टर राज कुमार हा गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किश्तवारचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप वझीर यांनी सांगितले, की या स्फोटामागील कारणे शोधण्यात येत असून, चौकशी सुरु आहे. स्फोटामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किश्तवारमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच असल्याने या स्फोटाचा दहशतवादी कारवाईशी संबंध असण्याची शक्यता आहे. भारतीय लष्कराकडून किश्तवार, दोडा, रामबान या जिल्ह्यातून दहशतवाद्यांना हटविण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे.