हल्ल्यामागे लष्करे तैयबा; जम्मू-काश्‍मीर पोलिसांचा दावा

हल्ल्यामागे लष्करे तैयबा; जम्मू-काश्‍मीर पोलिसांचा दावा

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी केला आहे. यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकारांनी जम्मू-काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांना प्रश्‍न विचारले. प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यामागे लष्करे तैयबा या संघटनेचा हात असून, पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा दावा खान यांनी केला. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. हल्ल्याच्या निषेधार्थ आज जम्मूमध्ये उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. येथील बहुतेक दुकाने दिवसभर बंद होती. नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल आणि टीम जम्मू या संघटनांनी विविध ठिकाणी मोर्चे काढत राज्य सरकारविरोधी घोषणा दिल्या. काही निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्गही काही काळ अडवून ठेवला होता. राज्यातील आणि राज्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारवर असून, ते यामध्ये कमी पडल्याचा आरोप निदर्शकांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारने यात्रेकरूंच्या सुरक्षेचे केलेले दावे पोकळ ठरल्याचे त्यांनी म्हटले. या निदर्शकांना स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र होते. व्यापारी आणि छोट्या दुकानदारांनी बाजारपेठा बंद ठेवत हल्ल्याचा निषेध केला. निदर्शकांनी पुकारलेल्या "बंद'ला बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी आणि संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीर सरकारने हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी सहा लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. श्री अमरनाथ यात्रा मंदिर समितीनेही प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांनाही दोन लाख रुपये, तर किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. मंदिर समितीनेही गंभीर आणि किरकोळ जखमींना अनुक्रमे दीड लाख आणि 75 हजार रुपये मदत दिली आहे.

बसचालकालाही इनाम
दहशतवादी गोळीबार करत असतानाही प्रसंगावधान राखल्याबद्दल बसचालक शेख सलीम गफूर यालाही सरकारतर्फे तीन लाख आणि मंदिर समितीतर्फे दोन लाख रुपये इनाम जाहीर करण्यात आले आहे. दहशतवादी बसवर गोळीबार करत असतानाही आणि या गोळीबारात बसच्या काचा फुटल्या असतानाही गफूर यांनी बस न थांबवता ती पुढे नेल्याने अनेकांचे प्राण वाचले.

हल्ला म्हणजे काश्‍मिरींवर डाग
अमरनाथ यात्रेवरील हल्ला हा काश्‍मीरच्या महान संस्कृतीला बसलेला मोठा धक्का असून, मुस्लिम आणि काश्‍मिरींवर मोठा डाग आहे, अशा शब्दांत राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपला संताप व्यक्त केला. काल रात्रभर हल्ल्यातील जखमींच्या भेटीगाठी घेणाऱ्या मुफ्ती यांनी आज बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. "अनेक अडचणी असतानाही दरवर्षी यात्रेकरू काश्‍मीरला येतात. त्यांच्यावरच हल्ला झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर पोलिस आणि लष्कर योग्य कारवाई करतील, असा मला विश्‍वास आहे. मात्र हा हल्ला सर्व काश्‍मिरी आणि मुस्लिमांवर डाग आहे. गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,' असे मुफ्ती यांनी या वेळी सांगितले. मुफ्ती यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दूरध्वनी करत दु:ख व्यक्त केले. हल्ल्यातील मृत आणि जखमी या दोन राज्यांतील आहेत. हल्ल्यानंतर मुफ्ती यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेबद्दल दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मुफ्ती यांचे आभार मानले.

अमरनाथ यात्रा सुरूच
दहशतवादी हल्ला होऊनही अमरनाथला जाणाऱ्या इतर यात्रेकरूंनी यात्रा पूर्ण करण्याचा निश्‍चय केला असून, आज 22,633 यात्रेकरूंचा एक गट यात्रेसाठी रवाना झाला. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढविली असल्याने यात्रेकरूंबरोबर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान बंदोबस्ताला होते.

दहशतवादी संघटनांकडून जल्लोष
इस्लामाबाद अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा जल्लोष केला आहे. असा जल्लोष करणाऱ्या संघटनांमध्ये बहुतेक सर्व संघटनांवर पाकिस्तानने बंदी घातली आहे. फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍप, टेलिग्राम अशा संकेतस्थळांवरून दहशतवाद्यांनी एकमेकांकडे आनंद व्यक्त केला आहे.

दिवसभरातील घडामोडी
- हल्ल्यात ठार झालेल्या सात यात्रेकरूंचे मृतदेह हवाई दलाच्या विमानातून सूरतला आणले
- लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडून सुरक्षेचा आढावा
- जम्मूमधील इंटरनेट सेवा बंद
- अमेरिकेकडून हल्ल्याचा निषेध
- नेपाळ आणि जर्मनीकडूनही निषेध व्यक्त
- इतर यात्रेकरूंनी न घाबरता यात्रा पूर्ण करण्याचे जम्मू काश्‍मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचे आवाहन
- उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्याकडून दु:ख व्यक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com