कडक सुरक्षाव्यवस्थेत अमरनाथ यात्रेला सुरवात

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

अमरनाथ यात्रा हे मोठे आव्हान आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
- एस. एन. श्रीवास्तव, सीआरपीएफचे विशेष महासंचालक

जम्मू : कडक सुरक्षाव्यवस्थेत आजपासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरवात झाली. 40 दिवस चालणाऱ्या या यात्रेतील दोन हजार 280 जणांची पहिली तुकडी आज यात्रेसाठी रवाना झाली. पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी पर्यटन राज्यमंत्री प्रिया सेठी आणि जम्मू- काश्‍मीरचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी पहिल्या तुकडीला झेंडा दाखवून रवाना केले.

"जय भोलेनाथ' आणि "बमबम भोले' अशा घोषणा देत भगवतीनगर येथील यात्री निवासमधून भक्तांच्या 72 गाड्या यात्रेसाठी रवाना झाल्या, असे सूत्रांनी सांगितले. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर यात्रेसाठी सर्वोच्च सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. काश्‍मीर खोऱ्यातील अशांतता आणि वाढता हिंसाचार लक्षात घेता यात्रेच्या मार्गावर उपग्रह ट्रॅकर सिस्टिम, जॅमर आणि बुलेटप्रूफ बंकर्स, श्‍वान पथक, सीसीटीव्ही कॅमेरे, शीघ्रकृतीदल यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. आज रवाना झालेल्या तुकडीत एक हजार 811 पुरुष, 422 महिला आणि 47 साधू यांचा समावेश असून, सर्वांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गाडीतून रवाना करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. बालाताल येथील बेसकॅम्पवरून 25 वाहनांमधून 698 जण, तर पहलगामहून एक हजार 535 भाविक आणि 47 साधू हे 47 वाहनांमधून यात्रेसाठी रवाना झाले.

यात्रेसाठीचा बंदोबस्त

  • पोलिस, लष्कर, सीमा सुरक्षा दल : 35 ते 40 हजार
  • केंद्रीय राखीव पोलिस दल
  • निमलष्करी दल : 250 अतिरिक्त तुकड्या
  • सीमा सुरक्षा दल : दोन हजार तुकड्या
  • पोलिस : 54 तुकड्या