पुलवामात दहशतवादी हल्ला; जवानासह पाच जण हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज पहाटे जिल्हा पोलिस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थाने असणाऱ्या भागात केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये रविंद्र बबन धनवडे या सातारा जिल्ह्यातील जवानासह पाच जण हुतात्मा झाले. यामध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान आणि पाच लोकही या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. "जैशे महंम्मद' या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

बारा तासांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये दोन दहशतवादीही मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या भागामध्ये हा हल्ला करण्यात आला, तेथेच नागरी वसाहतीही आहेत. प्रत्यक्ष लष्करी मोहिमेला सुरवात झाल्यानंतर लष्कराने दोन डझनपेक्षाही अधिक कुटुंबांना येथून सुरक्षितस्थळी हलविले, पुलावामातील इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली आहे. आज पहाटे काही दहशतवाद्यांनी पोलिस लाइनमध्ये प्रवेश करत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांमध्ये घुसखोरी केली होती, त्यानंतर संधी मिळताच त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरवात केली. हा आत्मघाती हल्ला असून अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

हुतात्मा जवानांमध्ये सातारा जिल्ह्यातील मोहोट (ता. जावळी) येथील रविंद्र बबन धनावडे (वय 38) यांचा समावेश आहे. ते गेली 17 वर्षे लष्करी सेवेत होते. त्यांची दोन वर्षांची सेवा राहिली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी मेघा, मुलगी श्रद्धा, मुलगा वेदांत, आई जनाबाई, भाऊ सचिन व किशोर असा परिवार आहे. रविंद्र यांचे कुटुंब साताऱ्यात वास्तव्यास आहे. उद्यापर्यंत (ता. 27) त्यांचे पार्थिक मोहोटला येईल, असे शासकीय सूत्रांकडून कुटुंबियांना सांगण्यात आले आहे.

कोणीही ओलिस नाही
दहशतवाद्यांनी पोलिस कॉम्पलेक्‍समध्ये प्रवेश करताच गोळीबार सुरू केला; पण अद्याप त्यांनी कोणत्याही कुटुंबास ओलिस ठेवलेले नाही. विद्यमान परिस्थिती हाताळण्याची पूर्ण क्षमता आमच्याकडे असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले. या चकमकीमध्ये जखमी झालेल्या जवानांना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.