भारतीय फौजांनी 2 पाकिस्तानी सैनिकांना घातले कंठस्नान

पीटीआय
गुरुवार, 15 जून 2017

जम्मू भागात आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबारेषेलगत 1 जानेवारीपासून अद्यापपर्यंत पाककडून 14 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 

जम्मू : पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या दोन सैनिकांना कंठस्नान घातले. जम्मू-काश्मीरमधील राजुरी आणि पूँच जिल्ह्यांतील दोन सेक्टरमध्ये ताबारेषेलगत पाकिस्तानी सैन्याने आज (गुरुवार) तीनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.  

पाकिस्तानी लष्कराने तोफगोळे आणि छोट्या बंदुका आणि स्वयंचलित शस्त्रांच्या साह्याने सीमेवरील चौक्यांवर, तसेच या भागातील नागरी वस्त्यांमध्ये गोळीबार केला. मागील चार दिवसांमध्ये पाकिस्तानने दहा वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू भागात आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबारेषेलगत 1 जानेवारीपासून अद्यापपर्यंत पाककडून 14 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार वाढला आहे. दहशतवाद्यांनी काल काश्मीर खोऱ्यात केलेले सात ग्रेनेड हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये 14 पोलिस कर्मचारी जखमी झाले. तसेच, त्यांच्याकडून दहशतवाद्यांनी पोलिसांच्या चार रायफल हिसकावून घेतल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय फौजांनी भिंबेर गली सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचे संरक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले.