काश्‍मीर खोऱ्यात आंदोलनाचा वणवा

काश्‍मीर खोऱ्यात आंदोलनाचा वणवा

फुटीरतावादी नेते ताब्यात; जनजीवन विस्कळित

श्रीनगर: सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीमध्ये तीन काश्‍मिरी तरुण ठार झाल्यानंतर खोऱ्यातील स्थिती आणखी चिघळली असून, राज्याच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, फुटीरवादी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यामध्ये हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांतील नेते सय्यद अली शाह गिलानी आणि मिरवाईज मौलवी उमर फारूख यांचा समावेश आहे. बडगाम जिल्ह्यात आंदोलनामुळे मोठे नुकसान झाले असून, सामान्य जनजीवनदेखील यामुळे विस्कळित झाले आहे.

श्रीनगर आणि अनंतनागमध्ये 9 आणि बारा एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून, फुटीरवाद्यांनी आधीच मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते गिलानी यांना मागील वर्षीच्या मे महिन्यापासून नजरकैदेत ठेवण्यात आले असून, त्यांना प्रार्थनेसाठीदेखील बाहेर निघू दिले जात नसल्याचा आरोप त्यांच्या प्रवक्‍त्याने केला आहे. हैदरपोरा भागामध्ये गिलानी यांचे निवासस्थान असून, त्याभोवतीही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गिलानी यांच्यासह महंमद अश्रम सेहारयी, शाबीर अहमद शाह, नईम अहमद खान, पीर सैफुल्ला, अल्ताफ अहमद शाह, राजा मेहराजुद्दीन आणि महंमद अश्रफ लाया यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील आठवडाभरामध्ये दक्षिण काश्‍मीरमधील शेकडो तरुणांना अटक करण्यात आल्याचा दावाही फुटीरवाद्यांकडून करण्यात आला आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या
आंदोलनामुळे काश्‍मीर विद्यापीठ आणि इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजीच्या परीक्षा उद्या (ता. 30)पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी सुरक्षा दले आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत 18 नागरिक जखमी झाल्याचे समजते. बहुतांश भागातील दुकाने, मॉल्स बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचे मोठे हाल होत असून, आरोग्य यंत्रणेवरही याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com