'जायका' 2019 पर्यंत पूर्ण होईल : मनोहर पर्रीकर

Jayaka project will be completed by 2019 say manohar parrikar
Jayaka project will be completed by 2019 say manohar parrikar

पणजी : दक्षिण गोव्यात 24 तास पाणी पुरवठा होत असून, काही भागात जलवाहिनींच्या गळतीमुळे पाण्याची समस्या आहे. पाणी पुरवठासंदर्भात आराखडा (मॅपिंग) तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या असलेल्या जलवाहिनी टप्प्याटप्प्याने बदलण्याचे काम सुरू केले जाईल. तसेच जायकाचे काम 2019 पर्यंत पूर्ण होईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज प्रश्‍नोत्तर तासावेळी विधानसभेत दिले. 

अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या आवश्‍यक साधन-सुविधा नसल्याने तसेच जुन्या जलवाहिनीमुळे त्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा दाब आल्यावर फुटल्याने होत आहे.  अनेकवेळा वीजपुरवठा खंडित झाल्यावरही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. उंचावर बसविलेल्या टाक्‍या तसेच जलाशय वापरात नाहीत. काही टाक्‍या डोंगराळ भागात बांधण्यात आलेल्या असल्याने त्या वापराविना पडून आहेत. सरकारने लोकांना 24 तास पाणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे त्यामुळे सरकारने वीज खंडित झाल्यास पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. यासाठी काही योग्य वीज सिस्टीममध्ये सुधारणा करणार आहे का, असा प्रश्‍न आमदार फिलीप नेरी यांनी विचारला होता. 

ज्या भागात घरे उतरणीवर आहेत त्यांना पाण्याची समस्या आहे. त्यामुळेच पाणी पुरवठासंदर्भात योग्य सल्लागारमार्फत आराखडा करणे गरजेचे आहे. सुमारे 152 एमएलडी प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहेत. पाण्याच्या टाक्‍यांमध्ये गळती आहे त्या दुरुस्त करण्याबरोबरच अतिरिक्त टाक्‍या बांधकाम हाती घेतले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सांताक्रुझ परिसरातील जलवाहिनी ही सुमारे 30 ते 40 वर्षे जुनी आहे. त्यामुळे वारंवार ती फुटण्याचे प्रकार होत आहेत. मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली मात्र पाणी क्षमता वाढवण्यात आली नाही ती वाढण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आमदार आंतोनिओ रॉड्रिग्ज यांनी केला. 

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, तिसवाडीसाठी 27 एमएलडी प्रकल्प येत आहे व त्याचे काम अंतिम टप्प्यात असून तो डिसेंबरमध्ये होईल. त्यानंतर ही समस्या सुटेल. 
सरकारने यापूर्वी गोव्याला 24 तास पाणी देण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही. दिवसेंदिवस राज्यात बांधकामे वाढली आहे. त्यामुळे सरकार भविष्यासाठी पाण्यासंदर्भातचे नियोजन करणार आहे का असा प्रश्‍न आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड यांनी केला. या प्रश्‍नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काही भाग वगळल्यास सालसेत भागात चोवीस तास पाणी पुरवठा होत आहे. राज्यातील पाणी पुरवठ्याची क्षमता वाढविण्यासाठी म्हैसाळ, अस्नोडा, चांदोर, पर्वरी, साळ व पाडोसे येथे प्रकल्पांच्या क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. 

सध्या राज्यात सुमारे 500 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचा तुटवडा नाही तर जलवाहिन्या जुन्या आहेत व त्या बदलण्याची गरज असून ते काम टप्प्याटप्प्याने केले जाईल. 
केपे मतदारसंघात जलवाहिनी टाकण्याचे जायकाचे काम सुरू आहे. मात्र कंत्राटदाराने हे काम अर्धवटच केले आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की जायकाचे काम 85 टक्के झाले असून ते पुढील वर्षी पूर्ण होईल असे मला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com