जयललितांवर मरिना बीचवर होणार अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांच्या पार्थिव शरीरावर आज दुपारी साडे चार वाजता चेन्नईतील मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे.

चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांच्या पार्थिव शरीरावर आज दुपारी साडे चार वाजता चेन्नईतील मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे.

जयललिता यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाची हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. रात्रीपासूनच चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य काही मान्यवर अंत्यदर्शनासाठी चेन्नईमध्ये येणार आहेत. तमिळनाडूमध्ये सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असून तीन दिवस शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत. तमिळनाडू नजीक केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीनेही आज दिवसभरासाठी सर्व शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड, कर्नाटक आणि बिहारनेही एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान जयललितांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

'केवळ तमिळनाडूच नव्हे तर संपूर्ण देश शोक व्यक्त करत आहे. त्या एक कुशल प्रशासक होत्या. त्यांच्या जाण्यामुळे देशात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे', अशा प्रतिक्रिया लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत.