समाजवादी पक्षाला 'जेडीयू'चा पाठिंबा

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

राज्यपाल अझिझ कुरेशी म्हणाले, की दहा वर्षांपासून पडून असलेल्या मौलाना मोहमद अली जोहर विद्यापीठ विधेयकाला मी संमती दिल्यामुळे भाजप सरकारने मला पदावरून हटविले होते

लखनौ : संयुक्त जनता दल (जेडीयू), उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझिझ कुरेशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष- कॉंग्रेस आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे.

"सप'च्या येथील मुख्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत "जेडीयू'चे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुरेश निरंजन यांनी सप- कॉंग्रेस आघाडीला "जेडीयू'चा पाठिंबा असल्याचे सांगितले. या वेळी माजी राज्यपाल अझिझ कुरेशी म्हणाले, की दहा वर्षांपासून पडून असलेल्या मौलाना मोहमद अली जोहर विद्यापीठ विधेयकाला मी संमती दिल्यामुळे भाजप सरकारने मला पदावरून हटविले होते, त्याचा बदला घेण्यासाठी भाजपच्या विरोधात मतदान करावे. मी समाजवादी पक्षात सहभागी होणार नाही, असेही कुरेशी यांनी या वेळी स्पष्ट केले.

डॉ. आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनीही आपला बहुजन समाज पक्षाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. "बसप'ने यापूर्वी भाजपबरोबर युती करून सत्ता स्थापन केली होती, त्यामुळे "बसप'ला आपला विरोध असल्याचे आंबेडकर म्हणाले. "सप'ला आपला पाठिंबा असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: jdu supports samajwadi party