पित्याच्या पाठीवर मुलाचे पार्थिव...

उज्ज्वलकुमार
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

झारखंडच्या गुमलातील प्रकार; रुग्णवाहिका दिलीच नाही

पाटणा/रांचीः बेफिकिरीचा आणखी एक नमुना झारखंडमध्ये सामोरा आला आहे. गुमला येथील रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्यामुळे एका पित्याला त्याच्या मुलाचे पार्थिव पाठीवर घेऊन घरी जावे लागले. सरकारने या संदर्भात अहवाल मागविला आहे.

झारखंडच्या गुमलातील प्रकार; रुग्णवाहिका दिलीच नाही

पाटणा/रांचीः बेफिकिरीचा आणखी एक नमुना झारखंडमध्ये सामोरा आला आहे. गुमला येथील रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्यामुळे एका पित्याला त्याच्या मुलाचे पार्थिव पाठीवर घेऊन घरी जावे लागले. सरकारने या संदर्भात अहवाल मागविला आहे.

गुमलामधील सदर रुग्णालयात एका मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्यांना मुलाचे पार्थिव पाठीवर घेऊन घरी जावे लागले. या मुलाची शोकमग्न आई त्यांच्यामागे होती. या मुलाचे नाव सुमन असून, तो केदली गावातील प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होता. या दुःखी दांपत्यावर ओढावलेला प्रसंग पाहून काही नागरिक मदतीला धावले आणि बस, रिक्षा व शेवटी गावातील एकाच्या मोटरसायकलवरून या मुलाचे पार्थिव गावात आणण्यात आले.

केदली हे गाव गुमलापासून 50 किलोमीटर अंतरावर असून, तेथील करणसिंह यांच्यावर हा करुण प्रसंग आला. सुमन हिवतापाने आजारी पडला होता. प्रकृती जास्त बिघडल्यामुळे करणसिंह यांनी त्याला सदर रुग्णालयात आणले. त्यांच्याकडे फक्त 300 रुपये होते. रुग्णालयातील तपासणीत मुलाला हिवतापाबरोबरच कावीळ झाल्याचे निदान झाले. रुग्णालयात औषधे नसल्यामुळे करणसिंह ती आणण्यासाठी बाहेर गेले. अर्ध्या तासाने ते परतले तेव्हा फार उशीर झाला होता आणि सुमनने जगाचा निरोप घेतला होता. या घटनेनंतर करणसिंह यांना मुलाचे पार्थिव गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकाही दिली गेली नाही. प्रत्यक्षात रुग्णालयात दहा रुग्णवाहिका आहेत; पण त्यातील एक गाडीही त्यांच्या मदतीला दिली गेली नाही.

स्थानिक वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात बातम्या आल्यावर मुख्यमंत्री रघुवर दास यांनी त्याची त्वरित दखल घेत या घटनेचा अहवाल 24 तासांच्या देण्याचा आदेश दिला आहे.

पहिलीच घटना नाही...
सदर रुग्णालयातून रुग्णालयात अशा घटना नव्या नाहीत. चतरा जिल्ह्यातील टंडवा येथील राजेंद्र उरांव यांना सर्पदंश झाला होता. सदर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातलगांनी रुग्णवाहिकेची मागणी केली असता, त्यांच्याकडे चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नातलगांनी आक्रोश करूनही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही. अखेर राजेंद्रचे पार्थिव हातात घेऊन नातलगांना निघावे लागले...