"जेएनयु'मध्ये मध्ये एक रणगाडा आणून ठेवा: जेएनयु कुलगुरु

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

जेएनयुमध्येही एक रणगाडा ठेवण्यात यावा. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या त्यागाचे व पराक्रमाचे सतत स्मरण राहिल

नवी दिल्ली - देशातील एक प्रभावशाली विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे (जेएनयु) कुलगुरु एम जगदीश कुमार यांनी केंद्र सरकारला एक विचित्र विनंती केली आहे. "विद्यापीठामधील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराकडून केल्या जाणारा त्याग व पराक्रमाचे स्मरण रहावे, म्हणून विद्यापीठाच्या आवारात एक रणगाडा ठेवण्यात यावा,' अशी विनंती कुमार यांनी केली आहे.

गेल्या वर्षी (2016) जेएनयुमधील विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणा देण्यात आल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या या विद्यापीठामध्ये रणगाडा ठेवण्याची कुलगुरुंची ही मागणी राजकीय दृष्टया वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे.

जेएनयुमध्ये या वर्षी "कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भारताचे माजी लष्करप्रमुख व सध्याचे राज्य पराराष्ट्र मंत्री व्ही के सिंह, आणि केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरुंनी सिंह व प्रधान यांना विद्यापीठास एक रणगाडा "मिळवून' देण्याची विनंती केली.

"इतर कोणत्याही देशात लष्कराला प्रश्‍न विचारले जात नाहीत. भारत हा लोकशाही देश असल्याने काही लोक भारताला हिणविण्यात धन्यता मानतात. परमेश्‍वराने अशा लोकांना सुबुद्धी द्यावी. भारतीय लष्कराने केलेल्या त्यागाचे स्मरण कारगिल विजय दिवसाच्या माध्यमामधून करण्यात येते. जेएनयुमध्येही एक रणगाडा ठेवण्यात यावा. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या त्यागाचे व पराक्रमाचे सतत स्मरण राहिल,'' असे कुमार म्हणाले.

यावेळी कुमार यांनी जेएनयुकडून यासंदर्भात उचलण्यात आलेल्या पावलांचा उल्लेखही करण्यात आला. "भारतमाता की जय', "वंदे मातरम' अशा घोषणा देत विद्यापीठात काढण्यात आलेल्या "तिरंगा मार्च'ने इतिहास घडविल्याची भावना त्यांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्त केली.