जोधपूर: दोन डॉक्‍टरांच्या भांडणात आईने बाळाला गमाविले

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

जोधपूर: शस्त्रक्रिया विभागात महिलेची प्रसूती करताना दोन डॉक्‍टरांमध्ये झालेल्या वादात महिलेला आपले नुकतेच जन्मलेले मूल गमवावे लागले. वैद्यकीय पेशातील मूल्ये धुळीला मिळविणाऱ्या या घटनेचा अहवाल पाठविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

जोधपूर: शस्त्रक्रिया विभागात महिलेची प्रसूती करताना दोन डॉक्‍टरांमध्ये झालेल्या वादात महिलेला आपले नुकतेच जन्मलेले मूल गमवावे लागले. वैद्यकीय पेशातील मूल्ये धुळीला मिळविणाऱ्या या घटनेचा अहवाल पाठविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

जोधपूरमधील उमेद महिला व मुलांच्या रुग्णालयात अनिता नावाची महिला प्रसूतीसाठी मंगळवारी सकाळी (ता.29) दाखल झाली होती. डॉ. इंद्रा भाटी यांनी तिला तपासले असता बाळाचे हृदयाचे ठोके मंदावलेले लक्षात आले. गर्भवती व बाळाचे प्राण वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याने अनिताला शस्त्रक्रिया विभागात हलविण्यात आले. तेथे एका टेबलावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक नैनवाल एका महिलेवर शस्त्रक्रिया करीत होते. अनिताला दुसऱ्या टेबलवर आणण्यात आले. त्या वेळी भूलतज्ज्ञ डॉ. एम. एल. टाक यांनी डॉक्‍टरांना बाळाचे ठोके तपासण्यास अन्य एका डॉक्‍टरांना सांगितले. या वेळी डॉ. नैनवाल संतप्त झाले आणि डॉ. टाक यांच्यावर ओरडले. डॉ.टाकही अनिताला सोडून डॉ. नैनवाल यांच्यासमोर आले. दोघांमध्ये भांडण सुरू झाले. तेथील परिचारिकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे भांडण थांबवायला तयार नव्हते.

यादरम्यान अनितावर प्रसूती शस्त्रक्रिया होऊन जन्माला आलेल्या मुलीचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. हृदयाचे ठोके बंद पडल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.या घटनेचे चित्रीकरण तेथे उपस्थित असलेल्या एकाने केले. ते पुढे सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्य सरकारच्या आदेशानुसार डॉ. नैनवाल यांची हकालपट्टी केली असून, निलंबित केलेल्या डॉ. टाक यांच्यावरील कारवाईसाठी त्यांच्या अहवाल जयपूरमधील कार्मिक विभागाकडे पाठविला आहे, असे एस. एन. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य अमिला भट यांनी सांगितले. या महाविद्यालयाच्या वतीने उमेद रुग्णालय चालविले जाते.

मृत बाळ जन्माला आल्याचा दावा
अनिताची प्रसूती झाली तेव्हा मृत बाळच जन्माला आले, असे डॉक्‍टरांनी सांगितल्याचा दावा तिची नणंद सुनीता हिने केले. गर्भवती असताना अनिताने कचरा पडलेले पाणी प्यायले. ते पाणी बाळाच्या पोटात गेल्याने मृत बाळ जन्माला आल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले, असे ती म्हणाली.