जुनैदला भोसकल्याची मुख्य संशयिताची कबुली

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

फरिदाबाद - जुनैद खान हत्याप्रकरणी काल (ता.8) धुळ्यातून अटक केलेल्या नरेंद्र इंद्रसिंग जाटला या मुख्य संशयिताने आपला गुन्हा कबूल केला असून, या कृत्याचा गोमांस प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

फरिदाबाद - जुनैद खान हत्याप्रकरणी काल (ता.8) धुळ्यातून अटक केलेल्या नरेंद्र इंद्रसिंग जाटला या मुख्य संशयिताने आपला गुन्हा कबूल केला असून, या कृत्याचा गोमांस प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

हरियानातील पलवालचा रहिवासी असलेला जाटला हा दिल्लीतील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता, अशी माहिती चौकशीत समोर आली असून, आज त्याला न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, दंडाधिकाऱ्यांनी त्याचा जबाब नोंदवून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. जाटला याने चौकशीदरम्यान, जुनैदला भोसकल्याची, तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन भावांवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिस अधीक्षक कमलदीप गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याचा गोमांस प्रकरणाशी काही संबंध आहे का, या प्रश्नावर गोयल यांनी चौकशीत असे कोणतेही कारण समोर न आल्याचे स्पष्ट केले. याबाबत दाखल फिर्यादीतही असे कोणतेही कारण नमूद नसल्याची माहिती त्यांनी दिली.

संबंध नसताना भांडणात सहभाग
जागेच्या कारणावरून जुनैद व रामेश्वर या दोघांत भांडण सुरू झाल्यानंतर जाटलाने त्यात उडी घेतली. वास्तविक तो रामेश्वरला ओळखतही नव्हता. हल्ल्यासाठी वापरलेला चाकू अद्याप ताब्यात घेण्यात आला नसून, तो जाटलाने स्वतःकडे असल्याचे चौकशीत सांगितले, अशी माहिती पोलिस अधीक्षक गोयल यांनी दिली.

फाशीची शिक्षा द्या; जुनैदच्या आईची मागणी
माझा मुलगा निरपराध असून, कोणीही त्याच्या मदतीला धावून न आल्याने मी त्याला गमावून बसले. त्याच्या हत्येत सहभागी असणाऱ्या मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच इतर आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी जुनैदच्या आईने केली.