सरन्यायाधीशांना सुनावली 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप व न्यायव्यवस्थेच्या अवमानप्रकरणी स्वतः कर्नान यांच्यावर खटला सुरू असून, आपण दलित असल्याने आपणास वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोप कर्नान यांनी केला आहे.

कोलकता : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह अन्य सहा न्यायाधीशांना अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याअंतर्गत दोषी धरत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप व न्यायव्यवस्थेच्या अवमानप्रकरणी स्वतः कर्नान यांच्यावर खटला सुरू असून, आपण दलित असल्याने आपणास वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोप कर्नान यांनी केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती.

आपल्या न्यायिक कर्तव्यांचे निर्वहन करावे, अशी कर्नान यांनी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. कर्नान यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे कारण न्यायालयाने दिले होते. तसेच 17 मार्च रोजी कर्नान यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंटही बजावले होते. त्यानंतर कर्नान यांनी सुनावणीस उपस्थित न राहिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांविरोधात 13 एप्रिल रोजी अजामीनपात्र वारंट जारी केले होते. या न्यायाधीशांनी आपला भर न्यायालयात अपमान करत आपल्या मानसिक स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचे कर्नान यांनी म्हटले होते.

दरम्यान, 1 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने कर्नान यांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले होते; मात्र कर्नान यांनी या चाचणीस नकार दर्शविला होता.