वादग्रस्त न्या. कर्नान नेपाळ किंवा बांगलादेशला पळाले?

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले न्या. कर्नान यांना अटक करण्यासाठी कोलकता पोलिसांचा पथक काल रात्री चेन्नईला गेले. चेन्नई पोलिसांच्या मदतीने या पथकाने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. 

नवी दिल्ली, चेन्नई - वादग्रस्त निर्णयांमुळे प्रकाशझोतात आलेले आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आलेले न्या. सी. एस. कर्नान हे नेपाळ किंवा बांगलादेशला पळून गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यांची कायदा सल्लागारांची टीम मात्र राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले न्या. कर्नान यांना अटक करण्यासाठी कोलकता पोलिसांचा पथक काल रात्री चेन्नईला गेले. चेन्नई पोलिसांच्या मदतीने या पथकाने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. 

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाप्रमाणे न्या. कर्नान यांचे प्रकरण राष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे सोपवावे, अशी मागणी कर्नान यांचे निकटवर्तीय व मद्रास उच्च न्यायालयातील वकील डब्लू. पीटर रमेशकुमार यांनी काही इंग्रजी माध्यमांशी बोलताना केली. याबद्दल कायदेशील लढाईची तयारी आम्ही करत आहोत. तोपर्यंत त्यांना काही वेळ गरजेचा आहे. राष्ट्रपती भेटीची वेळ देतील तेव्हाच ते भारतात येतील, असेही रमेशकुमार यांनी सांगितले. 

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार न्या. कर्नान यांनी बुधवारी सकाळीच सरकारी अतिथीगृह सोडले आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील कलाहस्तीच्या दिशेने ते रवाना झाले आहेत, असे त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरून कळाल्याचेही माध्यमांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयात कर्नान यांची याचिका 
कलकत्ता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी आज त्यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्या. कर्नान यांच्यातर्फे त्यांचे वकील मॅथ्यूज्‌ जे. नेदुम्पारा यांनी सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर केली. वकीलपत्र घेतल्याची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास आणि याचिकेची दखल घेण्यास तयार असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांनी यावेळी सांगितले. तसेच कर्नान हे सध्या कोठे आहेत, असा सवालही वकीलांना विचारण्यात आला. न्या. कर्नान यांचे वकीलपत्र घेण्यास 12 वकीलांनी नकार दिल्याचे मॅथ्यूज्‌ यांनी यावेळी सांगितले.